न्यूझीलंडमध्ये (New Zealand) 2020 च्या संसदीय निवडणूकीमध्ये निवडून आलेले मूळ हिमाचल प्रदेशचे खासदार, डॉ. गौरव शर्मा (Gaurav Sharma) यांनी वालिंग्टनमधील संसद भवनात मौरी भाषेसोबतच संस्कृत (Sanskrit) मध्ये शपथ घेतली आहे. 24 नोव्हेंबरला शपथविधी सोहळ्यात गौरव यांनी संस्कृत भाषेत शपथ घेऊन भारत आणि हिमाचल प्रदेश संस्कृतीचा अभिमान वाढवला आहे. गौरव शर्मा यांचा जन्म 1 जुलै 1987 रोजी सुंदरनगर, मंडी येथे झाला. गौरव मूळचे हमीरपूर जिल्ह्यातील हड़ेटा गावचे आहेत. गौरवने हमीरपूर, धर्मशाला, शिमला आणि न्यूझीलंड येथे शिक्षण घेतले आहे.
नुकत्याच न्यूझीलंडमध्ये झालेल्या निवडणुकीत गौरव शर्मा खासदार म्हणून विजयी झाले आहेत. यापूर्वी त्यांनी 2017 मध्येही निवडणूक लढवली होती, परंतु हॅमिल्टनकडून त्यांचा पराभव झाला होता. आता गौरव शर्मा यांनी न्यूझीलंडमधील निवडणुक जिंकून शपथग्रहण सोहळ्यात, आपल्या मातृभूमीवर प्रेम आणि आपुलकी दर्शविली आहे. त्यांनी संकृतमधून घेतलेली शपथ ही सध्या देशात आणि राज्यात प्रशंसेची गोष्ट ठरली आहे. सध्या सोशल मिडियावर याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.
डॉ. गौरव शर्मा यांनी हॅमिल्टन जागेवर लेबर पार्टीच्या तिकिटावर मोठा विजय नोंदविला आहे. त्यांना 15873 मते मिळाली होती, तर प्रतिस्पर्ध्याला 11487 मते मिळाली. गौरव शर्मा यांनी न्यूझीलंडमधील विद्यार्थी राजकारणातही मोठा सहभाग घेतला. मुख्य प्रवाहाच्या राजकारणातील ही त्यांची दुसरी निवडणूक आहे. शिक्षण घेत असताना ते विद्यापीठातील सिनेटमधील विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी देखील होते. याशिवाय त्यांची मेडिकल असोसिएशन आणि रीफ्युजी परिषदेच्या सदस्यतेसाठी निवड झाली आहे. (हेही वाचा: New Zealand Police थिरकले बॉलिवूडच्या Kala Chashma गाण्यावर; माधुरी दीक्षित ने शेयर केला Video)
दरम्यान, याआधी गौरव यांनी निवडणुका जिंकण्याच्या आनंदात त्यांच्या हमीरपूर गावात लाडू वाटून आनंद साजरा करण्यात आला होता. ढोल वाजवून गावकऱ्यांनी आपला आनंद व्यक्त केला होता. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनीही गौरव शर्मा यांचे निवडणूक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले होते.