हरयाणात मनोहरलाल खट्टर यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ
Haryana Manohar Lal Khattar Takes Oath as Cm (PC - ANI)

हरयाणात मनोहरलाल खट्टर (Manohar Lal Khattar) यांच्या नेतृत्वाखाली भाजपला जननायक जनता पार्टीने (जेजेपी) जाहीर पाठिंबा दिला. त्यानंतर आता खट्टर यांनी रविवारी (27 ऑक्टोबर) मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तसेच दुष्यंत चौटाला (Dushyant Chautala) यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांनी खट्टर यांना सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानंतर आज राजभवनात हा शपथविधी (Oath ceremony) सोहळा पार पडला आहे. या शपथविधी सोहळ्याला अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती.

एएनआय ट्विट - 

खट्टर यांनी हरयाणाचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली आहे. तर जननायक जनता पार्टीचे नेते दुष्यंत चौटाला उपमुख्यमंत्रिपदाची शपथ ग्रहण केली. दुष्यंत चौटाला यांच्या नेतृत्वाखालील जेजेपीचे समर्थन मिळाल्यानंतर मनोहरलाल खट्टर यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्यासाठी दावा दाखल केला होता. त्यावर राज्यपालांनी त्यांना लगेचच सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले. रविवारी दुपारी 2.15 वाजता खट्टर यांचा शपथविधी पार पडला.

राजभवन येथे पार पडलेल्या शपथग्रहण सोहळ्यात आज केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीच शपथ घेतली. यावेळी जजपा नेते दुष्यंत चौटाला यांचे वडील अजय चौटाला हेही उपस्थित होते. शपथग्रहण कार्यक्रमाला काँग्रेस नेता भूपिंदर सिंह हुड्डा, अकाली दलाचे नेता प्रकाश सिंह बादल आणि सुखबीर बादल उपस्थित होते. हरयाणात अनिल विज, घनश्याम सर्राफ, संदीप सिंह, अभय सिंह यादव, सुभाष सुधा, सीमा त्रिखा, कंवरपाल गुर्जर या नेत्यांची नावे मंत्रीपदाच्या शर्यतीत पुढे आहेत. याशिवाय धीर सिंगला, नरेंद्र गुप्ता, डॉ. कमल गुप्ता, ज्ञान चंद गुप्ता आणि दीपक मंगला या नावांचीही चर्चा सुरु आहे.

भाजपाचे 40, जेजेपीचे 10 आणि 7 अपक्षांनी सरकार स्थापन करण्याचा दावा राज्यपालांकडे केला. राज्यपालांनी खट्टर यांना सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले. खट्टर हे सलग दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. तसेच दुष्यंत यांच्या मातोश्री नयना चौटाला या राज्याच्या उपमुख्यमंत्री होऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगळी होती. परंतु, त्यांच्याऐवजी दुष्यंत चौटाला उपमुख्यमंत्री होणार असल्याचे जाहीर करण्यात आले.