Greater Noida Murder Case: स्विगी डिलिव्हरी बॉयने नव्हेतर 'या' तिघांनी रेस्टॉरंट मालकाची केली हत्या, पोलीस चौकशीतून धक्कादायक माहिती उघड
Gun (Photo Credits: IANS)

दिल्लीतील (Delhi) ग्रेटर नोएडामध्ये (Greater Noida) एका रेस्टॉरंट मालकाची गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. स्विगी डिलिव्हरी बॉयनेच (Swiggy Delivery Boy) रेस्टॉरंट मालकाची हत्या केली, अशी माहिती प्रसारमाध्यमांत आज दिवसभर झळकत होती. याप्रकरणी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता धक्कादायक माहिती उघड झाली आहे. दरम्यान, रेस्टॉरंट मालकाची हत्या स्विगी डिलिव्हरी बॉयने नव्हेतर हॉटेलमध्ये बसलेल्या 3 जणांनी केल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताचे नाव सुनील अग्रवाल असे आहे. मृत व्यक्ती ग्रेटर नोएडाच्या मित्रा सोसायटीमध्ये झम झम नावाचे अन्न वितरण रेस्टॉरंट चालवायचे. दरम्यान, मंगळवारी रात्री स्विगीचा डिलिव्हरी बॉय चिकन बिर्याणी आणि 'पुरी सब्जी'ची ऑर्डर देण्यासाठी त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये आला होता. मात्र, एकच ऑर्डर तयार असून दुसऱ्या ऑर्डरसाठी वेळ लागणार असल्याचे रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी डिलिव्हरी बॉयला सांगितले. यावर संतापलेल्या डिलिव्हरी बॉय रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांशी वाद घालू लागला. त्यावेळी सुनील अग्रवाल यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, डिलिव्हरी बॉय सुनील यांच्याशीही हुज्जत घालू लागला. याचदरम्यान, हॉटेलमध्ये बसलेल्या 3 जण उठले आणि डिलिव्हरी बॉयची बाजूने सुनील अग्रवाल यांच्याशी वाद घालू लागले. मात्र, त्यावेळी हॉटेल व्यवस्थापनाने त्यांना विरोध केला असता, त्यातील एकाने पिस्तूल काढून सुनील यांच्या डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर सर्व आरोपी फरार झाले. या हल्ल्यात जखमी झालेल्या सुनील यांना एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. हे देखील वाचा- Haryana Shocking: हरियाणात खळबळ! आई-वडील, बहिण आणि आजीची हत्या केल्याप्रकरणी 19 वर्षीय तरूणाला अटक

याप्रकरणातील आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तिन्ही आरोपी बुलंदशहरच्या अनुपशहर येथील रहिवाशी आहेत. ग्रेटर नोएडाचे एडीसीपी विशाल पांडे यांनी सांगितले की, आरोपी दुचाकीवरून पळून जात असताना पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पोलिसांनी झाडलेली एक गोळी आरोपी विकास चौधरी याच्या पायाला लागली. ज्यात तो जखमी झाला. त्याचवेळी पोलिसांनी आरोपी देवेंद्र आणि सुनील यांचा पाठलाग करून त्यांना अटक केली आहे.