हरियाणाच्या (Haryana) रोहतक (Rohtak) येथून सर्वांना हादरून टाकणारी माहिती समोर आली आहे. एकाच कुटुंबियातील चार सदस्यांची हत्या केल्याप्रकरणी एका 19 तरूणाला अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. मृत व्यक्तींमध्ये आरोपीचे आई-वडील, बहिण आणि आजीचा समावेश आहे. या हत्येमागचे कारण अद्याप समोर आले नसून रोहतक पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करीत आहेत, अशी माहिती पोलीस अधिक्षक राहुल शर्मा यांनी दिली आहे.
अभिषेक असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिषेकने त्याचे वडील प्रदीप, आई बबली, बहीण नेहा आणि आजी रोशनी यांची गोळ्या घालून हत्या केली आहे. आरोपी अभिषेकला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस चौकशी दरम्यान आरोपी मुलाने या संपूर्ण हत्येबद्दल सांगितले आहे. या प्रकरणाच्या तळाशी जाण्यासाठी काही लोकांची चौकशी केली जात आहे. येणाऱ्या काळात गोष्टी स्पष्ट होतील. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि अभिषेकची सतत चौकशी केल्याने या प्रकरणाचा पोलिसांना छडा लावता आला आहे. हे देखील वाचा- Corona Virus Update: लसीकरणात भारताचा नवा विक्रम, एका दिवसात तब्बल 1.32 कोटी दिले डोस
पोलिसांनी सांगितले की, अभिषेक वारंवार आपले वक्तव्य बदलत होता. या हत्याकांडापूर्वी आणि नंतर तो एका हॉटेलमध्ये गेला होता. हॉटेलमध्ये थांबलेल्या त्याच्या मित्राच्या भूमिकेचीही चौकशी केली जात आहे.