आजच्या धकाधकीच्या जीवनात लोकांसाठी ऑनलाईन गोष्टी मागवणे हे अक्षरशः वरदान ठरत आहे. कपड्यांपासून ते भाजीपाला, किराणा सामानही आता ऑनलाईन मागवले जाते. यामुळे वेळ आणि एनर्जीची चांगलीच बचत होते. यात आता अजून एका महत्वाच्या गोष्टीची भर पडली आहे, ती म्हणजे पेट्रोल आणि डिझेल. होय आता तुम्ही पेट्रोलदेखील ऑनलाईन मागवू शकणार आहात. इंडियन ऑईल कार्पोरेशन (Indian Oil Corporation) ने ही सुविधा पुरवण्यास सुरुवात केली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार तुम्हाला घरबसल्या कमीत कमी 200 लिटर तर जास्तीत जास्त 2500 लिटर पेट्रोल किंवा डिझेल मागवता येणार आहे. या सुविधेमुळे मोठ्या गाड्यांना तासनतास पेट्रोल पंपावर रांगेत उभे राहण्याचा त्रास वाचणार आहे.
भारतातील सर्वात मोठी पेट्रोलियम कंपनी इंडियन ऑईल कार्पोरेशनने काही महिन्यांपूर्वी अशा प्रकारे पेट्रोलची घरपोच सुविधा पुरवणार असल्याची घोषणा केली होती. महाराष्ट्रातील पुणे येथे ही सुविधा सर्वप्रथम सुरु करण्यात आली. आता ती चेन्नई येथेही सुरु झाली आहे. यासाठी कंपनीने रिपोज अॅपही सुरू केले आहे, ज्याद्वारे तुम्ही तुमची ऑर्डर देऊ शकता. मात्र हे पेट्रोल तुमच्या घरी साठवण्यासाठी तुमच्याकडे पेट्रोलियम आणि स्फोटके सुरक्षा संस्था (PESO) परवाना असणे आवश्यक आहे. यामध्ये साधारण 6000 लिटर इतकी क्षमता असणारे ट्रक अशा पेट्रोलचे वाटप करतील. या ट्रकच्या बाबतील आगीची कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून, अतिशय काळजी घेण्यात आल्याचे कंपनीने सांगितले आहे. (हेही वाचा : पेट्रोल, डिझेल दरात वर्षभरातील दिसालासादायक घसरण; देशातील प्रमुख शहरांतील इंधनदर सत्तरीत)
छोट्या गावांसाठी किंवा खेडेगावांसाठी, जिथे पेट्रोल पंपांची संख्या कमी असते अशा ठिकाणी या सुविधेचा फार मोठा फायदा होणार आहे. सध्या तरी ही सुविधा ज्यांना जास्तीत जास्त किंवा मोठ्या प्रमाणावर पेट्रोलची आवश्यकता असते अशांसाठी असणार आहे. मात्र लवकरच सामान्य ग्राहकांसाठीही ही सेवा उपलब्ध होईल अशे आशा आहे.