कोरोनामुळे लॉकडाऊन, अनलॉकिंगनंतर उर्वरित बाजारात व्यापार काहीसे ठप्प आहेत. मात्र, आंतराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती वाढल्याने भारतीय सराफा बाजारात मोठी तेजी आल्याचे पाहायला मिळत आहे. सोन्याच्या दरात (Gold Price) मागील महिनाभरापासून सोन्याचे दर सातत्याने वाढतच आहेत. त्यामुळे सराफा व्यवसायिकांचीही चिंता वाढली आहे. मुंबईत (Mumbai) आज सोन्याचा भाव 54 हजाराच्या पुढे गेला आहे. मुंबईत आज सोने खरेदी करण्यासाठी प्रतितोळा 54 हजार 828 रुपये मोजावे लागणार आहे.
मागील दोन आठवड्यापासून सोन्याच्या दरात विलक्षण वाढ होताना दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही वाढ होत असल्याने यामागील कारणांचं देखील विश्लेषण होतंय. मात्र, वाढत्या सोन्याच्या किमतीमुळे सोने सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर जात असल्याचे पाहायला मिळत आहे. महिनाभरात प्रतितोळा सोन्याच्या किमतीत 5 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. हे देखील वाचा- COVID-19 Lockdown: एप्रिल ते जुलै दरम्यान 80 लाखांहून अधिक पीएफ धारकांनी काढली 30,000 कोटींची रक्कम
शुद्ध सोने कसे ओळखले जाते?
सोन्यावर हॉलमार्कचे चिन्ह आणि 999, 916, किंवा 875 असे अंक लिहलेले असतात. याच अंकावरून सोन्याची शुद्धता लक्षात येते. हॉलमार्कच्या चिन्हाबरोबर 999 हा अंक असेल तर, सोने 24 कॅरेट असते. 999 चा अर्थ असा आहे की, यामधील सोन्याची शुद्धता 99.9 टक्के आहे. 23 कॅरेट सोन्यावर 958, 22 कॅरेट सोन्यावर 916, 21 कॅरेट सोन्यावर 875 तर, 18 कॅरेट सोन्यावर 750 हे अंक असतात.
दरम्यान कोरोना विषाणूचे संकट संपूर्ण जगावर ओढावल्याने अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला फटका बसला आहे. देशासह राज्यात कोरोनाचे संकट कायम असून कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोना बाथितांचा आकडा 14 लाख 83 हजार 156 वर पोहचला आहे. यापैकी 33 हजार 425 जणांचा मृत्यू झाला असून 9 लाख 52 हजार 743 जणांनी कोरोनावर मात केली आहे.