COVID-19 Lockdown: एप्रिल ते जुलै दरम्यान 80 लाखांहून अधिक पीएफ धारकांनी काढली 30,000 कोटींची रक्कम
EPF | (Photo Credits: PTI)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये (Lockdown) 4 महिन्यात तब्बल 30,000 कोटी इतका पीएफ (PF) काढण्यात आला आहे. एप्रिल महिन्यापासून याला सुरुवात झाली असून तब्बल 80 लाख पीएफ धारकांनी आपली पीएफ सेव्हिंग्स मोडली आहेत. यामुळे आर्थिक वर्ष 2021 (Financial Year 2021) मधील उत्पन्नावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

रिपोर्टनुसार, एप्रिल आणि जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत पीएफ मधून काढण्यात आलेली रक्कम इतर वर्षांच्या तुलनेत खूपच अधिक आहे. कारण कोविड-19 लॉकडाऊनमुळे अनेक जणांच्या नोकऱ्यांवर गदा आली असून बहुतांश लोकांना पगार कपातीला समोरे जावे लागले. त्याचप्रमाणे वैद्यकीय खर्च हे देखील पीएफ काढण्याचे एक कारण आहे. लॉकडाऊन दरम्यान एकूण 80 लाख पीएफ धारकांनी 30,000 कोटी पर्यंत रक्कम काढली आहे. तर 22,000 कोटी हे 50 लाख लोकांकडून वैद्यकीय खर्चासाठी काढण्यात आले आहे. अशी माहिती EPFO अधिकाऱ्यांनी दिली आहे. (पीएफ खातेदारांना दिलासा; कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रोजगार मंत्रालयाची मोठी घोषणा)

भारतात देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर अर्थमंत्री निर्माला सीतारमण यांनी पीएफ काढण्यासाठी एक विशेष घोषणा केली होती. या काळात पीएफ खात्यातून काढण्यात आलेल्या रक्कमेचा रिटर्न्सवरील परिणाम हाा मॉयक्रो लेव्हल अॅन्यालिसिस केल्यावरच कळेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

एक वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जसजशी कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे तसतशी पीएफ मधून रक्कम काढणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. पीएफ मधून पैसे काढणाऱ्यांची संख्या लक्षात घेता पुढच्या काही काळात अजून 10 लाख पीएफ धारक आपल्या पीएफ खात्यातून पैसे काढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.