धक्कादायक! हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये महिला रुग्णावर सामुहिक बलात्कार; नर्सने इंजेक्शन देऊन केले होते बेशुद्ध
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: ANI)

आजकाल रस्त्यावरच नाही तर चक्क हॉस्पिटलमध्येही महिला सुरक्षित नाही असेच म्हणावे लागेल. उत्तरप्रदेश राज्यातील मेरठ (Meerut) येथे एका हॉस्पिटलमध्ये महिलेवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. आश्चर्य म्हणजे ही घटना महिला जेव्हा आयसीयूमध्ये होती तेव्हा घडली आहे. या महिलेला लिव्हरचा त्रास होता त्यामुळे शनिवारी तिला हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याच रात्री जेव्हा तिला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले तेव्हा तिच्यासोबत हे कृत्य घडल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी चार पुरुष आणि एका महिलेला ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी केली जात आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पिडीत महिला नौचंदी येथील राहणारी आहे. लिव्हरचा त्रास होत असल्याने शनिवारी  ती आपल्या पतीसह मेरठच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये आली होती. त्या रात्री तिला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. रात्री एका नर्सने तिला बेशुद्ध होण्याचे इंजेक्शन दिले  आणि त्यांनतर 4 पुरुषांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. काही काळानंतर असे काही घडल्याची माहिती या महिलेने आपल्या पतीला दिली. पतीने याबाबत गुन्हा दाखल केला आहे.  (हेही वाचा: वडिलांना झाडाला बांधून मुलीवर सामूहिक बलात्कार, 6 नराधमांचे कृत्य)

पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. दरम्यान जेव्हा बलात्कार झाला तेव्हा आयसीयूमधील सीसीटीव्ही कॅमेरा बंद होते असे पोलिसांनी सांगितलं आहे. तसेच आयसीयूमधील इतर रुगांनी असे काही घडले नसल्याचे सांगितले आहे. दरम्यान ही महिला एका मांत्रिकाच्या प्रभावाखाली होती अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे, पोलिसांनी त्या मंत्रीकालाही अटक केली आहे.  या प्रकरणी पोलिसांची एक विशेष टीम तपास करीत आहे.