Yogi Adityanath (Photo Credits: IANS)

Yogi Adityanath On Abu Azmi: ‘औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता’, असं आमदार अबू आझमी म्हटलं होतं. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (SP MLA Abu Azmi) यांनी औरंगजेबाबाबत केलेल्या या विधानानंतर महाराष्ट्रात चांगलंच राजकारण तापलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचे महाराष्ट्राच्या विधानसभेत देखील पडसाद उमटले आहेत.अबू आझमी यांच्या विधानाचे पडसाद फक्त महाराष्ट्रातच नाही तर उत्तर प्रदेशमध्येही पाहायला मिळाले आहेत.

उत्तर प्रदेशच्या विधानसभेत अबू आझमी यांच्या विधानावरून मोठा गदारोळ पाहायला मिळाला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( Yogi Adityanath) यांनी अबू आझमी यांना चांगलंच सुनावलं आहे. “कंबख्तको पार्टी से निकालो, उत्तर प्रदेश भेज दो, इलाज हम करेंगे”, असं म्हणत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षावरही जोरदार टीका केली. समाजवादी पक्षाचे लोक औरंगजेबला आपला हिरो मानत असल्याचा हल्लाबोल योगी आदित्यनाथ यांनी केला.

योगी आदित्यनाथ यांनी म्हटल की, “अबू आझमी यांना (समाजवादी) पक्षातून काढून उत्तर प्रदेशला पाठवा. आम्ही त्यांचा इलाज करू, समाजवादी पक्षाने एकीकडे महाकुंभमेळ्याला दोष दिला आणि आता देशातील मंदिरे उद्ध्वस्त करणाऱ्या औरंगजेब सारख्या व्यक्तीची प्रशंसा समाजवादी पक्षाच्या एका आमदाराकडून होते, तरीही समाजवादी पक्षाकडून त्या विधानाचा निषेध का केला जात नाही?”, अशा शब्दांत योगी आदित्यनाथ यांनी टीका केली आहे.

अबू आझमी यांनी काय वक्तव्य केलं होतं?

“चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. औरंगजेबाने अनेक मंदिरे बनवलेली आहेत. मी औरंगजेबाला क्रूर प्रशासक मानत नाही. तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील जी लढाई होती, ती लढाई राज्य कारभाराची होती. ती लढाई कुठेही हिंदू आणि मुस्लिमांची होती असं मी मानत नाही”, असं विधान अबू आझमी यांनी माध्यमांशी बोलताना केलं होतं.