Death | Representational Image | (Photo Credits: Twitter)

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) अशोकनगर जिल्ह्यात एका वृद्ध दाम्पत्याचा (Elderly Couple) चहामुळे मृत्यू झाला. वृद्ध आजीला तिच्या कमकुवत डोळ्यांमुळे चहा पावडर ओळखता आली नाही. वृद्ध महिलेने चहाच्या पत्तीच्या जागी दुसर्‍या खोलीतून कीटकनाशक उचलले आणि ते उकळत्या पाण्यात टाकले. हा चहा पिल्याने वृद्ध जोडप्याचा मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा उपचारानंतर बरा झाला. मुंगावली परिसरातील कचियाना भागातील रहिवासी श्रीकिशन सेन आणि कोमलबाई या वृद्ध जोडप्यासाठी सकाळचा चहा त्यांचा शेवटचा चहा असेल याची कोणालाही कल्पनाही केली नसेल. नेहमीप्रमाणे श्रीकिशन सेन मंदिरात जायला तयार होते. यावेळी पत्नी कोमलबाई स्वयंपाकघरात गेली आणि चहा बनवू लागली. चहा पावडर संपल्यामुळे ती दुसर्‍या खोलीतून चहा पावडर आणण्यासाठी गेली. मात्र, तिची नजर अतिशय कमजोर होती. ज्यामुळे तिला खूपचं कमी दिसत होतं. कोमलबाईने चहा पावडर समजून कीटकनाशकाचा पुडा उचलला.

स्वयंपाकघरात आल्यानंतर त्यांनी उकळत्या पाण्यात कीटकनाशक टाकले. कोमलबाई यांनी हा चहा आपल्या नवऱ्याला दिला आणि मुलाला दिला. त्यानंतर तिने स्वत: देखील चहा घेतला. चहा प्यायल्यानंतर श्रीकिशन सेन सायकलवरून मंदिराकडे निघाले. मात्र, काही अंतर गाठल्यानंतर त्यांना चक्कर येऊ लागली. श्रीकिशन यांच्या मुलाला चहा कडवट लागला त्यामुळे त्याने चहा तसाच ठेवला. तेवढ्यात शेजाऱ्यांनी श्रीकिशन यांना चक्कर आल्याचं सांगितलं. (हेही वाचा - Sex With Corpse: महिलेची हत्या करुन मृतदेहासोबत सेक्स, आंध्र प्रदेश राज्यातील घटना)

श्रीकिशन यांना बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. दुसरीकडे घरात कोमलाबाई आणि मुलगा जितेंद्र यांचीही प्रकृती बिघडू लागली. यानंतर शेजाऱ्यांनी या दोघांना रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी कोमलबाई यांना मृत घोषित केलं. सुदैवाने उपचारादरम्यान श्रीकिशन यांचा मुलगा जितेंद्रला वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं.

या प्रकरणाची माहिती मिळताच मुंगावली पोलिस स्टेशनचे प्रभारी सोनपालसिंग तोमरही घटनास्थळी दाखल झाले. चहा पावडरच्या जागी चुकून कीटकनाशके टाकण्यात आल्याची माहिती पोलीस स्टेशन प्रभारी यांनी दिली. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. एका वृद्ध दाम्पत्याच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे.