Vivekananda Yoga University: भारताबाहेरील पहिल्या योग विद्यापीठाचे अमेरिकेत उद्घाटन; योगगुरू नागेंद्र असतील अध्यक्ष
योगा (Photo Credits: File Photo)

सहावा आंतरराष्ट्रीय योग दिन (International Yoga Day) साजरा करण्यासाठी, लॉस एंजेलिसमध्ये (Los Angeles) भारताबाहेरचे पहिले योग विद्यापीठ (Yoga University) स्थापन करण्यात आले आहे. विदेश राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन आणि स्थायी समितीचे अध्यक्ष पीपी चौधरी यांच्या हस्ते मंगळवारी न्युयॉर्क येथे, भारतीय वाणिज्य दूतावासातर्फे ऑनलाईन आयोजित कार्यक्रमात 'विवेकानंद योग विद्यापीठा'चे (Vivekananda Yoga University) उद्घाटन करण्यात आले. स्वामी विवेकानंद योग फाउंडेशनचे कुलगुरू आणि प्रख्यात योगगुरू डॉ. एच. आर नागेंद्र (Dr H R Nagendra), हे याचे पहिले अध्यक्ष असतील. जयपूर फूट यूएसएचे वाणिज्य दूतावास अध्यक्ष आणि विवेकानंद योग विद्यापीठाचे संस्थापक संचालक प्रेम भंडारी यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.

मुरलीधरन या प्रसंगी म्हणाले की, स्वामी विवेकानंद यांनी अमेरिकेतून बंधुत्वाचा संदेश दिला होता आणि आता भारताबाहेरच्या प्रथम योग विद्यापीठाच्या माध्यमातून अमेरिकेहून जगापर्यंत योगाचा संदेशही प्रसारित केला जाईल. 'योग हा मानसिक संतुलन आणि भावनिक स्थिरता प्रदान करतो.’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे योग सल्लागार म्हणून ओळखले जाणारे नागेंद्र म्हणाले की, ‘स्वामी विवेकानंद यांनी 1893 मध्ये शिकागो येथे आपल्या प्रसिद्ध भाषणातून जगासमोर भारतीय योगाची 'भव्यता' मांडली होती. आता आधुनिक युगातील आव्हानांचा सामना करण्यासाठी, त्यांच्याद्वारे प्रदान केलेली शिकवण आणि उपायांमुळे प्रेरित होऊन आम्ही योगास शैक्षणिक आयाम देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.’ (हेही वाचा: वृक्षासन ते भुजंगासन सर्वांना शक्य होतील अशी 'ही' योगासने)

VaYU हे योगशास्त्राची वैज्ञानिक तत्त्वे आणि आधुनिक संशोधन पद्धतींवर आधारित, ऑनलाइन पदवीधर कार्यक्रम ऑफर करेल. VaYU च्या शिक्षकांची भरती भारतातील पहिले योग विद्यापीठ SVYASA मधून झाली आहे. विद्यापीठ योगासंबंधित ऑनलाइन मास्टरचा कार्यक्रम ऑफर करेल. 24 ऑगस्टपासून व्हर्च्युअल मोडमध्ये सुरू होणा क्लासच्या 2020 च्या सेमिस्टरचे अर्ज खुले आहेत.