Polytechnic Admission 2022-23: ITI विद्यार्थ्यांना दिलासा; आता थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविकेच्या कोणत्याही शाखेत मिळणार प्रवेश
Representational Image (Photo Credits: PTI)

शैक्षणिक वर्ष 2022-23 या वर्षाच्या पदविका प्रवेश प्रक्रियेत 3 मुख्य बदल करण्यात आले आहेत. यात कोणताही ट्रेड घेऊन आयटीआय उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना आता थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या कोणत्याही शाखेत प्रवेशाची संधी मिळणार आहे. कोणत्याही ट्रेडमधून 10 वी नंतरचा आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यास कोणत्याही पदविका अभ्यासक्रमाच्या शाखेस प्रवेशासाठी संधी उपलब्ध होणार आहे. या बदलामुळे साधारणत: 10 हजार विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत म्हणाले, शैक्षणिक वर्ष 2022-23 करिता तंत्रशिक्षण पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले असून इयत्ता दहावी परीक्षेच्या निकालाअगोदरच या पोर्टलद्वारे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती भरून प्रक्रियेत सामील होता येणार आहे. ही तंत्रशिक्षण पदविका प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे.

पॉलिटेक्निकला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीच्या निकालाअगोदरच माहिती भरता येणार आहे. निकाल लागल्यानंतर त्यांना मिळालेल्या गुणांची नोंद घेऊन पुढील प्रवेश प्रक्रिया होणार आहे. पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया आज दि. 2 जून 2022 रोजी सुरु करण्यात आली आहे. पदविका प्रवेशासाठीचे सविस्तर वेळापत्रक, प्रवेश प्रकियेचा तपशील, उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना तसेच ऑनलाईन अर्ज https://dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे. (हेही वाचा: पुढील वर्षीपासून पदवीच्या प्रवेशप्रक्रियेत CET च्या गुणांसोबत 12वीचे गुण देखील महत्त्वाचे; पहा सरकारचा नवा नियम)

राज्य शासनाने पदविका अभ्यासक्रमाकरिता या योजनेअंतर्गत कोरोनामुळे आई व वडील गमावलेल्या पात्र उमेदवारांसाठी प्रत्येक संस्थेतील प्रत्येक अभ्यासक्रमासाठी दोन या प्रमाणात अधिसंख्य जागा उपलब्ध केल्या आहेत. या विद्यार्थ्यांना केंद्र शासनाच्या स्वनाथ योजनेअंतर्गत पदविका अभ्यासक्रमाच्या शिक्षणासाठी प्रत्येक वर्षी 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत.

दरम्यान, शैक्षणिक वर्ष 2022-23 करीता पदविका प्रवेशाच्या लिंक देण्यात आलेल्या आहेत. प्रथम वर्ष पदविका (10वी नंतर)- http://poly22.dte.maharashtra.gov.in प्रथम वर्ष पदविका (12 वी नंतर)- https://phd22.dte.maharashtra.gov.in उपलब्ध करण्यात आले आहे.