Mumbai's 'Dabbawalas' in Kerala School Syllabus: मुंबईमध्ये महादू हावजी बच्चे यांनी 1890 साली 35 डबेवाल्यांसह, मुंबईकरांना डब्बे (Mumbai Dabbawala) पोहोचवण्याची सेवा सुरु केली होती. हळूहळू ही सेवा वाढत गेली आणि जवळजवळ 5 लाख लोकांना डब्बे पोहोचवण्यापर्यंत तिने मजल मारली. डब्बेवाल्यांचे हे कामाचे तंत्र पाहता त्यांना ‘मॅनेजमेंट गुरु’ अशी पदवी देत त्यांच्या कामाचा गौरव केला आहे. आता मुंबईतील प्रसिद्ध डब्बावाल्याची कहाणी लवकरच केरळमधील (Kerala) प्रत्येक घरापर्यंत पोहोचणार आहे. केरळ सरकारने याला शालेय अभ्यासक्रमाचा भाग बनवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या पाठ्यपुस्तकातील पाच पानांच्या धड्यात इयत्ता 9वीच्या इंग्रजी अभ्यासक्रमात डब्बावाल्यांच्या कथेचा समावेश करण्यात येणार आहे.
'द सागा ऑफ द टिफिन कॅरिअर्स' नावाचा हा अध्याय केरळमधील इयत्ता 9वीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकात समाविष्ट केला जाईल. हा अध्याय लेखक ह्यू आणि कॉलीन गँट्झर यांनी लिहिला आहे. केरळ स्टेट कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (एससीईआरटी) ने 2024 च्या अद्ययावत अभ्यासक्रमात 'डब्बावाला' या कथेचा समावेश केला आहे. मुंबईत डब्बावाला कसा सुरू झाला हे या प्रकरणात सांगितले जाईल. केरळच्या शालेय अभ्यासक्रमात याचा समावेश केल्याचे कळल्यानंतर डब्बावाल्यांनी राज्याच्या शिक्षण विभागाला मेलद्वारे कृतज्ञता व्यक्त केली
दरम्यान, मुंबईतील डब्बा व्यवसाय 130 वर्षांहून अधिक जुना आहे. अनेक चित्रपट, माहितीपट, पुस्तके आणि संशोधनामुळे त्यांचे कार्य अधिक प्रसिद्ध झाले आहे. एवढेच नाही तर त्यांच्या कामाला वाहिलेले एक कॉमिक बुक देखील आहे, जे मुंबईचे कलाकार अभिजीत किणी यांनी 2019 मध्ये तयार केले होते. (हेही वाचा: मुंबईच्या डबेवाल्यांना कॉन्व्हेंट शाळांमध्ये 'नो एन्ट्री'; प्रशासनाविरुद्ध शिक्षणमंत्र्यांकडे तक्रार)
डब्बावाले आयआयटी आणि आयआयएमसह व्याख्यान देण्यासाठी भारत आणि परदेशातील अनेक प्रतिष्ठित संस्थांना भेट देतात. मात्र, कोविड-19 साथीच्या रोगाचा डब्बावाल्यांच्या कामावर गंभीर परिणाम झाला आहे, त्यांची संख्या सुमारे 2,000 पर्यंत कमी झाली आहे. सध्या केवळ असेच लोक हा वयवसाय करत आहेत, ज्यांना रोजगाराची प्रचंड गरज आहे.