Maharashtra Board SSC Result 2021: शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितला यंदाच्या 10वीच्या परीक्षा निकालाचा फॉर्म्युला; 11वी प्रवेशासाठी द्यावी लागणार वैकल्पिक सीईटी
Varsha Gaikwad | (Photo Credits-Facebook)

महाराष्ट्रामध्ये यंदा कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर आता दहावीची परीक्षा (Maharashtra Board SSC Exams) रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांना परीक्षा रद्द झाल्यास यंदा दहावीचा निकाल (Maharashtra Board SSC Result) कसा लावणार? पुढे 11वीचे प्रवेश कसे दिले जाणार? असे एक ना अनेक प्रश्न पडले आहेत. पण या प्रश्नांवर आज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी खुलासा केला आहे.  यंदा 10वीचे निकाल हे 9 वीचे मार्क्स आणि 10 वीच्या वर्गात प्रात्याक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन यांच्या आधरावर लावले जाणार आहेत. तर 11वी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

भारतात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा प्रभाव पाहता महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाप्रमाणेच सीबीएसई, आयसीएसई बोर्डाने देखील आपल्या 10वीच्या परीक्षा रद्द करत विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल कसा लावणार?

विद्यार्थ्यांच्या 9 वीच्या गुणांना 50 टक्के, अंतर्गत मूल्यमापनाला 30 टक्के आणि तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षांना 20 टक्के गुण दिले जातील. या सुत्रानुसार दहावीचे निकाल यंदा जाहीर होतील. तर अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना वैकल्पिक सीईटी द्यावी लागणार आहे, सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजांमध्ये प्राधान्याने प्रवेश मिळेल आणि रिक्त जागांवर इतर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल असे देखील सांगण्यात आले आहे.

पुनर्परीक्षार्थी, खाजगी,तुरळक विषय घेऊन बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र मूल्यमापन धोरण निश्चित केले आहे. श्रेणीसुधार योजनेंतर्गत बसलेल्या विद्यार्थ्यांना लागू पुढील 1 किंवा 2 संधी अबाधित राहतील.

दहावी बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा महाराष्ट्र राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी जनहित याचिका काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली आहे.दहावीची परीक्षा यंदा 29 एप्रिल ते 20 मे 2021 पर्यंत आयोजित करण्यात आली होती मात्र ती आता रद्द झाली आहे. आणि परीक्षेविनाच निकाल लावण्यावर सरकार ठाम आहे. त्याबाबतचा जीआर आज जारी करण्यात आला आहे. CBSE 10th Result 2021 Date: सीबीएसई 10 वीचा निकाल आता जुलैमध्ये; मार्क्स सबमिट करण्याच्या तारखांमध्येही बदल.

राज्यात दहावीची परीक्षा रद्द झाली असली तरीही बारावीच्या परीक्षांबाबत अद्यापही सरकार विचाराधीन आहे. राज्यातील कोविडची परिस्थिती पाहून राज्यात 12वीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर  होणार आहेत.