JEE Advanced 2021 Postponed: 3 जुलैला होणारी जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा कोविड 19 मुळे लांबणीवर; लवकरच जाहीर होणार नवी तारीख
Exam | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

भारतामध्ये मागील दीड महिन्यांपासून धुमाकूळ घालत असलेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये आता यंदाच्या शैक्षणिक वर्षाचे देखील बारा वाजले आहेत. अनेक बोर्डांनी दहावीच्या परीक्षा रद्द करत विद्यार्थ्यांना वर्गोन्नती दिली आहे. तर 12 वीच्या परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. तशीच स्थिती आता देशभर होणार्‍या जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेची (JEE Advanced 2021) आहे. 3 जुलै 2021 दिवशी आयोजित जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा आता लांबणीवर पडली आहे. आज त्याबाबतचं अधिकृत परिपत्रक जारी करत ही परीक्षा कोविड 19 परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर स्थगित केली जात आहे. परीक्षेची नवी तारीख लवकरच जाहीर केली जाईल असं म्हटलं आहे. इथे पहा अधिकृत परिपत्रक .

जेईई मेन परीक्षा पार पडल्यानंतर त्यामधील अडीज लाख विद्यार्थी देशभरातील आयआयटीज मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी जेईई अ‍ॅडव्हानसची परीक्षा देतात. त्यामधील मार्क्स आणि रॅंक नुसार पुढील प्रवेश प्रक्रिया सुरू होते. पण अद्याप देशात कोरोना स्थितीवर पूर्ण नियंत्रण मिळू शकलं नसल्याने अनेक राज्यांनी किमान मे महिन्याच्या अखेरीपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवला आहे. त्यामुळे अनेक परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत.

दरम्यान जेईई अ‍ॅडव्हान्स्ड 2021 परीक्षेसाठी 2 पेपर असतात. पहिल्या शिफ्टमध्ये सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत पेपर I होतो. दुसरी शिफ्ट दुपारी 2.30 ते सायंकाळी 5.30 दरम्यान पेपर II घेतला जातो. आता परीक्षेची नवी तारीख देखील jeeadv.ac.in. वर सांगितली जाईल.

यंदा  JEE Advanced 2020 मध्ये रजिस्ट्रेशन केलेल्या पण कोविड 19 मुळे परीक्षा देऊ न शकलेल्यांना देखील 2021 मध्ये थेट परीक्षा देण्यची मुभा देण्यात आली आहे. यावेळेस त्यांना पुन्हा नव्याने JEE Main 2021 देण्याची गरज नाही.