भारतामध्ये पुन्हा कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता सीबीएसई बोर्डाचे काही विद्यार्थी, पालक यंदाच्या परीक्षांची प्रॅक्टिकल परीक्षा पुढे ढकलण्याचा विचार करण्याची सूचना करत आहेत. तर कोरोनाबाधित मुलांसाठी या प्रॅक्टिकल परीक्षा पुढे ढकलल्या जाणार अशा आशयाचे काही मेसेजेस, अफवा सोशल मीडीयामध्ये फिरत आहेत. मात्र सीबीएसई बोर्डाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अशाप्रकारची वृत्त खोटी असल्याचं आणि बोर्डाने कोरोनाबाधित विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द केल्याचा कोणताही निर्णय घेतला नसल्याचं सांगण्यात आले आहे. SSC, HSC Board Exams 2021 देणार्या विद्यार्थ्यांनाही परिक्षेपूर्वी कोरोनाची लस देण्याची शिवसेनेची लोकसभेत मागणी.
एका न्यूज पोर्टल सोबत बोलताना, सीबीएसई प्रवक्तांनी कोविड 19 पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरं जाण्यासाठी अजून एक संधी दिली जाईल हे वृत्त नाकारलं आहे. सध्या 10 वी 12 वीच्या सीबीएसई बोर्डाच्या प्रॅक्टिकल परीक्षा घेण्यासाठी अनेक शाळांमध्ये सुरूवात झाली आहे. त्यामुळे या खोट्या वृत्तांवर सीबीएसई कडून खुलासा देण्यात आला आहे. सध्या केवळ सीबीएसई बोर्डाने विद्यार्थ्यांना जर ते कोविड 19 संकटामुळे कुठे इतरत्र गेले असतील तर त्यांना परीक्षा केंद्र बदलण्याची मुभा दिली आहे. ही मुभा लेखी आणि प्रॅक्टिकल परीक्षेसाठी असेल.
मागील वर्षभरापासून घोंघावणारा कोरोना वायरस संक्रमणाचं संकट आता पुन्हा झपाट्याने पसरायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे काही विद्यार्थी आपल्या पालकांसह दुसर्या राज्यांत किंवा देशात गेले आहेत. त्यामुळे रजिस्ट्रेशनची जागा आणि परीक्षेची जागा यामध्ये आता बदल झाले आहेत. त्यामुळे नोटिफिकेशन जारी करत बोर्डाने परीक्षा केंद्र बदलण्यासाठी परवानगी दिली आहे.
यंदा सीबीएसई बोर्डाने त्यांच्या 10वी, 12वी परीक्षांच्या तारखांमध्ये बदल केले आहेत. नव्या वेळापत्रकानुसार बोर्डाच्या परीक्षा 4 मे ते 14 जून 2021 दरम्यान होतील. असे सांगण्यात आले आहे.