'किसान सारथी' डिजिटल मंचाचा प्रारंभ, आता शेतकऱ्यांना आपपल्या भाषेत मिळणार योग्य माहिती
(Photo Credit PIB)

शेतकऱ्यांसाठी किसान सारथी (Kisan Sarathi) या डिजिटल मंचाचा प्रारंभ झाला आहे.आयसीएआर अर्थात भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या 93 व्या स्थापनदिनाचे औचित्य साधून दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या मंचाचा प्रारंभ झाला. याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता आपपल्या भाषेत योग्य माहिती मिळणार आहे. शेती आणि संबंधित क्षेत्रांविषयी थेट शास्त्रज्ञांकडून व्यक्तिविशिष्ट सल्ला मिळण्याची सुविधा या डिजिटल मंचांमुळे उपलब्ध आहे. 'किसान सारथी' या डिजिटल मंचाचा प्रारंभ कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंग तोमर (Narendra Singh Tomar) आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी केला आहे.

'किसान सारथी' हा उपक्रम दुर्गम क्षेत्रातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांच्या सक्षमीकरणासाठी तंत्रज्ञानाची मदत करेल. याबद्दल मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे अभिनंदन केले. या डिजिटल मंचामुळे आता थेट कृषी विज्ञान केंद्रांच्या शास्त्रज्ञांकडून शेती आणि संबंधित क्षेत्रांविषयी व्यक्तिविशिष्ट सल्ला मिळण्याची सुविधा उपलब्ध झाल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. हे देखील वाचा-NABARD Application 2021: नाबार्ड मध्ये 162 असिस्टंट मॅनेजर आणि मॅनेजर पदांसाठी नोकर भरती, अर्ज प्रक्रियेसंबंधित जाणून घ्या अधिक

या उपक्रमात इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव अजय साहनी, आयसीएआरचे महासंचालक आणि डीएआरइ अर्थात कृषी संशोधन तथा शिक्षण विभागाचे सचिव डॉ.त्रिलोचन मोहपात्रा, डिजिटल इंडिया महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक सिंग यांच्यासह संबंधित मंत्रालये आणि विभागांचे वरिष्ठ अधिकारीही या कार्यक्रमात सहभागी झाले. तसेच शेतकरी आणि या क्षेत्रातील भागीदार व जबाबदार व्यक्तींचाही यामध्ये सहभाग होता. देशभरातील कृषी विज्ञान केंद्रेही यावेळी सहभागी झाली.