Bomb Threat (फोटो सौजन्य - File Image)

Delhi School Bomb Threat: दिल्लीतील चाळीसहून अधिक शाळांना पुन्हा बॉम्बने उडवण्याची धमकी (Delhi Bomb Threat) मिळाली आहे. ही धमकी ईमेलद्वारे पाठवण्यात आली आहे. 8 डिसेंबर रोजी रात्री 11.38 च्या सुमारास हा मेल आला. मेल पाठवणाऱ्याने तीस हजार डॉलर्सची खंडणी (Ransom) मागितली आहे. आधी डीपीएस आरके पुरम आणि पश्चिम विहारच्या जीडी गोएंका शाळेला बॉम्बची धमकी मिळाली होती. त्यानंतर शाळांनी मुलांना घरी पाठवले. यानंतर या प्रकरणाची माहिती अग्निशमन दल आणि पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले असून तपास करत आहेत. (Delhi Schools Bomb Threat: दिल्लीतील दोन शाळांना ईमेलद्वारे बॉम्बने उडवण्याची धमकी, बॉम्ब शोधक पथकाकडून तपास सुरू)

तीस हजार डॉलर्सची मागणी

शाळेच्या आवारात बॉम्ब लावण्यात आल्याचे मेलमध्ये सांगण्यात आले. या बॉम्बचा स्फोट झाला तर मोठे नुकसान होईल. धमकी पाठवणाऱ्या व्यक्तीने बॉम्बचा वापर टाळण्यासाठी आणि शाळांचया सुरक्षांसाठी 30 हजार डॉलर्सची मागणी केली आहे. दिल्ली पोलिस आयपी ॲड्रेसद्वारे मेल पाठवणाऱ्याचा तपास करत आहेत.

यापूर्वीही धमक्या आल्या

याआधी 20 नोव्हेंबरला रोहिणीतील व्यंकटेश्वर ग्लोबल स्कूलला बॉम्बची धमकी मिळाली होती. त्याच वेळी तामिळनाडूतील एका शाळेला 21 ऑक्टोबर रोजी बॉम्बची धमकीही मिळाली होती. 20 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील रोहिणी भागात शाळेच्या भिंतीत स्फोट झाला होता. त्यामुळे आजूबाजूच्या दुकानांचे व वाहनांचे नुकसान झाले होते. खलिस्तान समर्थक गटाने या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली होती. यानंतर दिल्ली पोलिसांनी त्या गटाची माहिती गोळा केली. अलीकडे अनेक शाळा, विमान कंपन्या, हॉटेल्स आणि स्थानकांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत. मात्र, अखेर या घटना खोट्या असल्याचे सिद्ध झाले आहे.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले होते की, एअरलाइन्सकडून मिळणाऱ्या खोट्या धमक्यांचे प्रमाण 2023 मधील 122 वरून 2024 मध्ये 994 पर्यंत वाढले आहे, जे 714.7 टक्क्यांनी वाढ दर्शवते. जूनमध्ये एअरलाइन्सला 666 बॉम्बच्या धमकीचे कॉल आले. जूनमध्ये अशा 122 धमक्या आल्या. सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2023 मध्ये 15 धमकीचे कॉल रेकॉर्ड करण्यात आले.