Delhi Result 2025

Delhi Result 2025 Updates: दिल्लीतील सर्व ७० जागांसाठीचा निकाल आज जाहीर होणार आहे. समोर येत असलेल्या निकालात आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मतमोजणी दरम्यान भाजपला बहुमत मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही फाईल्स कुठे जाऊ नये म्हणून दिल्ली सचिवालय सील करण्यात आले आहे.  भाजप सरकार भ्रष्टाचाराविरोधात कठोर कारवाई करण्याच्या तयारीत असून सत्तेत येताच अनियमिततांची चौकशी सुरू करू शकते, असे मानले जात आहे. निवडणूक निकालानंतर राजधानीच्या राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला असून आता नव्या सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आपचे अरविंद केजरीवाल यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आपचे मनीष सिसोदिया जंगपुरा मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. सीएम आतिशी विजयी झाल्या आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, दिल्लीच्या जनतेने भाजपवर विश्वास व्यक्त केला आहे, जो अत्यंत महत्त्वाचा आहे. आम्हाला दिल्लीला प्रदूषणमुक्त आणि जगातील सर्वात सुंदर शहर बनवायचे आहे. मला विश्वास आहे की, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीची प्रतिमा बदलेल. आम्ही अपेक्षेपेक्षा चांगला विजय मिळवला आहे.

दिल्लीत सध्या भारतीय जनता पक्ष (भाजप) ७० पैकी ४५ हून अधिक जागांवर आघाडीवर असून, २७ वर्षांनंतर राजधानीत पुन्हा सत्तेत येणे जवळपास निश्चित झाले आहे. दरम्यान, आम आदमी पक्षाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागत आहे. हा ऐतिहासिक निकाल दिल्लीच्या राजकारणात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणत आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या विजयाच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे खासदार आणि अभिनेते रवी किशन यांनी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आश्वासन असल्याचे म्हटले. त्यांनी सांगितले, "हे जनतेचे भाजपावरचे विश्वास आहे. मुख्यमंत्रिपदाचा कोणताही चेहरा निश्चित झाला नाही, तरीही जनतेने आम्हाला बहुमत दिले. संपूर्ण दिल्लीच्या जनतेचे आभार." सरकारवर टीका करताना रवी किशन म्हणाले की, अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाचे "घाणेरडे राजकारण" आता संपले आहे.  दिल्लीची जनता नरकीय जीवनातून मुक्त झाली असून आता राजधानीचा झपाट्याने विकास होईल, असा दावा त्यांनी केला. भाजप नेत्याच्या या वक्तव्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे.