दिल्ली: इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर बेवारस बॅगमध्ये आरडीएक्स सापडले

दिल्ली (Delhi)  येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Indira Gandhi International Airport) आज आरडीएक्सने (RDX) भरलेली 3 बॅग सापडल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. शुक्रवारी मध्यरात्री 1 च्या सुमारास स्थानिक पोलिसांना संशयास्पद बॅग मिळाल्याची बातमी मिळाली. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस पथकाने विमानतळावर असलेल्या बेवारस बॅग त्यांच्या ताब्यात घेतल्या. दरम्यान, पोलिसांना तपासात या तिन्ही बॅगमध्ये आरडीएक्स आढळले. त्यानंतर त्वरित बॉम्ब विल्हेवाट पथकाला संबधित ठिकाणी बोलवण्यात आले. त्यावेळी सर्व प्रवासी आणि गाड्यांची हालचाल थांबवण्यात आली होती.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्री 1 वाजता पिलर क्रमांक 4 च्या प्रवेशद्वाराजवळ कॉन्टेबल व्हि. के सिंह यांना एक संशयास्पद बॅग सापडली. त्यानंतर सिंग यांनी त्यांच्या पोलीस सहकाऱ्यांना याची माहिती कळवली. पोलीस सहकारी घटनास्थळी आल्यानंतर बॅग ताब्यात घेऊन ईव्हीडी तपास केला. त्यावेळी पोलिसांना त्या बॅगेत आरडीएक्स असल्याचे समजले. त्यानंतर बॉम्ब विल्हेवाट पथकाला तातडीने बोलवण्यात आले. दरम्यान, प्रवशांची आणि गाड्यांची हालचाल पूर्णपणे बंद करण्याचे आवाहन बॉम्ब विल्हेवाट पथकाने केले. तसेच टर्मिनल-3 समोरचा रस्ता बंद करण्यात आला. त्यावेळी विमानतळावर लोकांना टर्मिनल-3 मधून बाहेर पडण्याची परवानगी नव्हती. हे देखील वाचा- 7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यानंतर आता 'या' शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार महागाई भत्ता आणि DA मध्ये वाढ

एएनआयचे ट्वीट-

सध्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात करण्यात आली आहे. तसेच रात्री 3 वाजल्यापासून टर्मिनल-3 समोरसा रस्ताही सुरु करण्यात आला आहे. विमानतळ उपायुक्त संजय भाटिया म्हणाले की, आरडीएक्सने भरलेल्या बॅग सीआयएसएफच्या मदतीने काढून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहे.