'तितली' वादळाचा फटका, आंध्र प्रदेश, ओडीसात ९ जणांचा बळी; वाहतूक ठप्प, जनजीवन विस्कळीत
File Photo (Photo Credits: ANI)

'तितली'चक्रीवादळाचा आंध्र प्रदेश आणि ओडीसातील काही जिल्ह्यांना जोरदार फटका बसला आहे. आंध्र प्रदेशच्या आपत्तीव्यवस्थापण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, वादळीवाऱ्यासह कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे आंध्रातील ६ गावांमध्ये हाहाकार उडाला आहे. या सहा पैकी मिलियापत्तू आणि श्रीनिवासपूरम या दोन गावांमध्ये प्रचंड हानी झाली आहे. तर, गोपाळपुरम, पूंच, पुडू, मुंकदपुरम आणि गंगाईपूडू आदी गावांत मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळत आहे. मात्र, याही गावांमध्ये सोसाट्याचा वारा आहे.

गुरुवारी (११ ऑक्टोबर) रात्री वादळाचा वेग काहीसा मंदावला. प्राप्त माहितीनुसार वादळाचा तडाखा बसल्यामुळे आतापर्यंत ९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी ८ जण आंध्र प्रदेशातील आहेत. तर एक जण ओडीसातील आहे. ऑल इंडिया रेडिओने दिलेल्या वृत्तानुसार, चक्रीवादळ सध्या उत्तरपूर्व दिशेने सरकत आहे. वादळ आणि पावसाचा फटका बसल्याने वाहतूक आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशाखापट्टन, पुरी आणि बालासोर रेल्वे स्टेशन्सवर हजारो प्रवाशी अडकले आहेत. (हेही वाचा, तितली चक्रीवादळ : वादळांची नावं कोण आणि कशी ठरवतात ?)

दरम्यान, वादळामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासनही सज्ज आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून काही ठिकाणांवरील सुमारे तीन लाख नागरीकांना इतर ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे. ओडिसा आणि आंध्र प्रदेश ही दोन्ही राज्ये 'तितली'च्या प्रभावाखाली आहेत.