फनी चक्रीवादळ (Photo Credit-ANI)

गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा असलेल्या फनी (Fani) वादळाने काल ओडिशाच्या किनारपट्टीवर धडक मारली. प्रतितास 200 किलोमीटर वेगाने धावत असलेल्या या वादळाने ओडीशात हाहाकार माजवला. वादळाचा प्रचंड वेग आणि मूलाधार पडणारा पाऊस यांमुळे ओडिशात 8 लोकांचे बळी गेले व प्रचंड नुकसान झाले. आता हे वादळ शनिवारी पश्चिम बंगालमध्ये धडकले. पश्चिम बंगालमध्ये या वादळाचा वेग ताशी 90 किलोमीटरच्या इतका आहे. पश्चिम बंगाल मध्येही समुद्रकिनाऱ्याजवळील भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, मच्छमारांना समुद्रात न जाण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे.

या वादळामुळे आंध्र प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा इत्यादी राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजता फॅनी चक्रीवादळ पुरी येथे थडकले. वादळाच्या तडाखा बसलेल्या अनेक ठिकाणी घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. तर, अनेक झोपड्या आणि झाडे कोसळली आहेत. यामध्ये 160 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. (हेही वाचा: 'फनी' चक्रीवादळाचा वाहतूक सेवेला फटका, कोलकत्ता विमानतळ बंद, विशाखापट्टणम ते मुंबई सीएसएमटी धावणार स्पेशल ट्रेन)

पश्चिम बंगालमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने कोलकाता विमानतळ बंद ठेवण्यात आला आहे. तसेच पश्चिम बंगालमधील तब्बल 220 एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. जोरदार पावसामुळे हवामान खात्याने पश्चिम बंगालच्या सात जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. बऱ्याच ठिकाणी  100 ते 110 किमी प्रति तास वेगाने वारे वाहू शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.