इम्रान खान (Photo Credits: Instagram)

पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात भारताचे 40 पेक्षा जास्त जवान शहीद झाले, या घटनेचा जगभरातून निषेध केला जात आहे. अमेरिका आणि रशिया या जगातील दोन महासत्तांनीदेखील भारताला पाठींबा दर्शवला आहे. या घटनेमुळे भारतात संतापाची लाट पसरली आहे. या पार्श्वभूमीवर क्रिकेट क्लब ऑफ इंडियाने (CCI) पाकिस्तानचे पंतप्रधान आणि माजी कर्णधार इम्रान खान यांचे पोस्टर झाकून पुलवामा हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. सीसीआयने आपल्या एका रेस्टॉरंटमध्ये इम्रान खान यांचे पोस्टर लावले होते. पाकिस्तानचे माजी कर्णधार इम्रान खान हे सध्या पाकिस्तानचे पंतप्रधान आहेत. पाकिस्तान अशा दहशतवादी संघटनांना थारा देतो, म्हणून सीसीआयने त्यांचे पोस्टर झाकून टाकले आहे.

सीसीआयने आपल्या मैदानाच्या आवारात आणि रेस्टॉरंटमध्ये जगभरातील दिग्गज क्रिकेटपटूंची छायाचित्रे लावली आहेत. यामध्ये पाकिस्तानला १९९२ चा विश्वचषक जिंकून देणाऱ्या इम्रान खान यांचेही पोस्टर लावण्यात आले होते. सीसीआयने हे पोस्टर झाकून टाकले आहे, हे झाकलेले पोस्टर पुन्हा कधी खुले करण्यात येईल हे सांगता येणार नाही अशी माहिती सीसीआयचे अध्यक्ष परिमल उदानी यांनी दिली. (हेही वाचा : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर 18 फेब्रुवारी रोजी व्यापाऱ्यांची 'भारत बंद'ची हाक)

जगभरातील तमाम देशांनीही या कृत्याबाबत पाकिस्तानचा निषेध केला आहे. फ्रान्स, जर्मनी, कॅनडा, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, दक्षिण कोरिया, मॉरिशस, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, इराण, इस्रायल आदींसह सुमारे 48 देशांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ट्‌विट करत आम्ही भारतासोबत असल्याचे सांगितले आहे.