Coronavirus: दिल्लीत 24 तासांत 20 नव्या कोरोना प्रकरणांची नोंद; एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 523 वर पोहचली
Delhi CM Arvind Kejriwal (Photo Credits: ANI)

दिल्लीत (Delhi) 24 तासांत 20 नव्या कोरोना प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीत एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 523 वर पोहचली आहे. यातील 10 रुग्णांनी दिल्लीतील निजामुद्दीन येथील मकरज कार्यक्रमाला हजेरी लावली होती. गेल्या 24 तासांत एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांनी माहिती दिली आहे.

आतापर्यंत दिल्लीत सापडलेल्या कोरोना बाधितांपैकी 330 रुग्ण हे तबलीगी जमातीच्या धार्मिक कार्मक्रमाला उपस्थित होते. दिल्लीत दररोज 1 हजार जणांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे, असेही अरविंद केजरीवाल यांनी सांगितले आहे. (हेही वाचा - निजामुद्दीहून परतलेल्या कोरोनाबाधीत तरूणाच्या वाहनाला अपघात; माहिती लपवल्यामुळे उपचार करणाऱ्या 40 डॉक्टरांसह 50 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या हातावर क्वारंन्टाईनचा शिक्का)

सध्या दिल्ली शहरातील नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. कोरोना चाचणी करण्यासाठी 1 लाख किट्सची ऑर्डर देण्यात आली आहे. याशिवाय मंगळवारपासून दिल्लीत रेशन कार्ड नसलेल्या गरीबांना 421 सरकारी शाळांमध्ये रेशनचे वितरण केले जाईल. प्रत्येक व्यक्तीला 4 किलो गहू आणि एक किलो तांदूळ देण्यात येईल. 10 लाख गरीब लोकांना रेशन देण्याचे आमचे ध्येय आहे. गरज भासल्यास केंद्राकडून मदत घेऊ, असंगही अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं आहे.