Cordelia Cruise (Photo Credits: Facebook)

देशभरात पुन्हा एकदा कोरोना विषाणू (Coronavirus) रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. आता मुंबईहून (Mumbai) गोव्याला (Goa) जाणाऱ्या कार्डेलिया क्रूझवरील (Cordelia Crusie Ship) 66 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या प्रकरणी अधिक माहिती देताना गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे म्हणाले की, प्रवाशांना उतरण्याची परवानगी द्यायची की नाही याचा निर्णय सरकार घेईल. यासोबतच राज्यात ओमायक्रॉनच्याही चार प्रकरणांची पुष्टी झाल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाची लागण सर्वप्रथम कार्डेलिया क्रूझवरील क्रूच्या एका सदस्याला झाली होती.

हा सदस्य जहाजावरील 2000 हून अधिक लोकांसह मुंबईहून गोव्याला रवाना झाला होता. सर्वप्रथम या क्रू मेंबरला जहाजावरच वेगळे केले गेले आणि त्यानंतर 1471 प्रवासी आणि 595 क्रू मेंबर्सची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली. या चाचणीत 66 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जहाज सध्या मुरगाव पोर्ट क्रूझ टर्मिनल, वास्कोजवळ थांबले आहे. कोणालाही चढण्याची आणि उतरण्याची परवानगी नाही.

सोमवारी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना शिप एजंट जेएम बक्षी गोविंद परनुलकर म्हणाले, 'आम्हाला सकाळी 9 वाजताच्या सुमारास जहाजाच्या डॉक्टरांकडून माहिती मिळाली की क्रू मेंबरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर आम्ही ताबडतोब सरकारी अधिकाऱ्यांना ही माहिती दिली आणि जहाज बाहेरच थांबवले.’ क्रू मेंबरला कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर मुंबई पोर्ट ट्रस्टने या क्रूझला प्रवाशांना गोव्यात उतरवण्याची परवानगी दिली नाही आणि सध्या हे क्रूझ जहाज मुरगाव बंदर क्रूझ टर्मिनलजवळ उभे आहे. (हेही वाचा: Pune: कोरेगाव भीमा येथे अनेकांना Covid-19 ची लागण; लाखो लोकांनी स्मारकाला दिली भेट)

दुसरीकडे, गोवा सरकार सोमवारपासून लसीकरण सुरू झाल्यानंतर येत्या चार दिवसांत 15-18 वयोगटातील सर्व 72,000 मुलांना पहिला डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. राज्याचे आरोग्य मंत्री विश्वजित राणे म्हणाले की, गोव्याला 15 ते 18 वर्षे वयोगटातील लसीकरणासाठी 72,000 डोस आधीच प्राप्त झाले आहेत.