कोरोना वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात भितीजनक वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, कोरोनाची लस बाजारात आल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला मिळावी, याकरीता अनेकजण धडपड करताना दिसत आहे. याच गोष्टीचा गैरफायदा घेत काही समाज कंटक नागरिकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहेत. भोपाळमध्ये फोनच्या माध्यमातून सर्वप्रथम कोरोनाची लस देण्याचे आश्वासन देणाऱ्या सहा तक्रारी दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच कोरोना लस बनवणाऱ्या विविध कंपन्यांचा डाटा सायबर हॅकिंगच्या माध्यमातून चोरी करून बनावट लस बनवली जाऊ शकते, असा पोलिसांचा अंदाज आहे. इंटरपोलने याबाबात अलर्ट जारी केला असून सगळ्यांनी सावधानता बाळगावी अशी माहिती पोलीस महानिरीक्षक, यशस्वी यादव यांनी दिली आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, हे गुन्हेगार फोनच्या माध्यमातून नागरिकांशी संपर्क साधतात. तसेच कोरोनाची लस सर्वात प्रथम मिळावी म्हणून संबंधित व्यक्तिला कोरोना लसीचा स्लॉट बूक करण्यासाठी सांगतात. दरम्यान, नोंदणी शुल्काच्या बहाण्याने नागरिकांकडून त्यांच्या बॅंकेच्या खात्याचा तपशील मागवतात. भोपाळ मधील एका व्यावसायिकाने दिलेल्या माहितीनुसार, त्याला केवळ पाचशे रुपयात कोरोनाची लस बूक करता येईल, असा फोन आला होता. भोपाळमध्ये आतापर्यंत अशाप्रकारच्या सहा फोनच्या तक्रारीची नोंद झाली आहे. यामुळे पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे तसेच कोणत्याही जाहिरातीला बळ न पडण्याचे आवाहन केले आहे. हे देखील वाचा- New Coronavirus Strain: ब्रिटनहून भारतात आलेले 20 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह; देशात भीतीचं वातावरण
कोरोना लसीसंदर्भात अशा प्रकारच्या फसवणूकीच्या फोनबद्दल जनतेला सतर्क करणारे अॅडव्हायझरी पोलिसांनी जारी केली आहे. तसेच भोपाळचे एएसपी सकले टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हणाले की, ऑनलाइन फसवणूक करणारे लोक ईमेलवर किंवा एसएमएसद्वारे पाठवलेल्या लिंकचा वापर करून मोबाइल अॅप डाउनलोड करण्यास सांगतात. या अॅपमध्ये स्क्रीन-सामायिकरण सॉफ्टवेअर असतो, ज्यामुळे त्यांना मोबाइलमधून बँकिंग तपशील चोरून नागरिकांची फसवणूक करण्यास मदत मिळते.