Coronavirus: आता रेल्वे गाड्यांमधील चहा, नाश्ता, भोजन होणार बंद; कोरोना पार्श्वभूमीवर आयआरसीटीसी घेतला मोठा निर्णय
Indian Railway (Photo Credit: Twitter)

भारतातही कोरना व्हायरसने (Coronavirus) धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाकडून योग्य ते निर्णय घेण्यात आले आहेत. नुकतेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या रविवारी संपूर्ण देशात जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. याच पार्श्वभूमीवर इंडियन रेल्वे केटरिंग ऍन्ड कॉर्पोरेशनने (IRCTC) महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. येत्या 22 मार्चपासून रेल्वेस्थानकावरील प्रवशांना चहा, नाश्ता आणि भोजनही मिळणार नाही. तसेच रेल्वेस्थानकावरील फूड फ्लाझा, रिफ्रेशमेंट, सेल किचन आणि जन आहारदेखील बंद करण्यात येणार आहे. येत्या 22 मार्चपासून आयआरसीटीसी सुचनांचे कठोरपणे पालन केले जाईल. याशिवाय, यासंदर्भात सर्व रेल्वेस्थानकांना आदेश देण्यात आलेले आहेत, असे मुख्य क्षेत्रीय महाव्यवस्थापक अश्विनी श्रीवास्तव यांनी सांगितले आहे.

कोरोना व्हायरसचे देशात सध्या 246 रुग्ण असून यांची संख्या अजून वाढू नये, म्हणून सरकारकडून खबरदारीची पाऊल उचलली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्चला जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे. जनता कर्फ्यू दरम्यान सकाळी 7 ते रात्री 9 या दरम्यान नागरिकांना घरबाहेर पडू नका, असे सांगण्यात आले आहे. जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने देखील अनेक एक्सप्रेस रेल्वे रद्द केल्या आहेत. तसेच मुंबईची लाईफलाईन म्हणजेच लोकल रेल्वेही रद्द करण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आयआरसीटीसीचे ग्रुप महाव्यवस्थापक आशीष भाटिया यांनी यांसंदर्भात 20 मार्चला सर्व झोनच्या महाव्यवस्थापकांना पत्र पाठवून सूचना केली आहे. यानुसार जोवर पुढील आदेश येत नाही, तोपर्यंत मेल आणि एक्सप्रेस रेल्वेमधील पेन्ट्रीकार आणि साईड वेडिंग व्यवस्था बंद राहतील. हे देखील वाचा- पुणे: पिंपरी-चिंचवड मध्ये 90 निगेटिव्ह रुग्णांना डिस्चार्ज

कोरोना व्हायरचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील कोरोना बाधीतांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. महाराष्ट्रात शुक्रवारपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 52 वर होती. मात्र, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात आणखी 11 रुग्णांची भर पडली असून एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 63 वर पोहचली आहे. दरम्यान, मुंबई येथे 10 तर, पुण्यात 1 रुग्ण आढळल्याचे त्यांनी सांगितले. यांपैकी 8 जण परदेशातून भारतात आलेले आहेत. तर, 3 जण संसर्गातून कोरोनाबाधित झाले आहेत.