Wrestler Protest (PC - ANI/Twitter)

Wrestler Protest: दिल्लीच्या जंतर-मंतर येथून नवीन संसदेसमोर महापंचायत भरवायला निघालेल्या पैलवानांना (Wrestler) पोलिसांनी अडवले. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. कुस्तीपटूंनी पोलिसांचा बॅरिकेड ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अनेक पैलवानांना ताब्यात घेण्यात आले आहे. कुस्तीपटू बजरंग पुनिया (Bajrang Punia) यांनी आम्हाला गोळी घाला, असं म्हटलं आहे.

पोलिसांनी रोखल्यानंतर कुस्तीपटू केरळ हाऊसजवळ धरणे धरून बसले. येथून संसद हाकेच्या अंतरावर आहे. तत्पूर्वी, कुस्तीपटू दोन अडथळे पार करून येथे पोहोचले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची राजधानी दिल्लीत नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले. दुसरीकडे, भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी नवीन संसद भवनावर मोर्चा काढण्याची घोषणा केली. (हेही वाचा - PM Modi Installs 'Sengol': नव्या संसद भवनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'सेंगोल' स्थापन (Watch Video))

उत्तराखंडमधील जगतार सिंह भाजपच्या नेतृत्वाखाली यूपी गेटवर शेतकऱ्यांची पंचायतही पोहोचली आहे. कुस्तीपटू बजरंग पुनियाने सांगितले की, आज नक्कीच महापंचायत होणार आहे. आम्ही आमच्या स्वाभिमानासाठी लढत आहोत. ते आज संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करत आहेत, पण ते देशातील लोकशाहीची हत्या करत आहेत. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आमच्या लोकांना सोडावे, असे आवाहन आम्ही प्रशासनाला करतो असंही बजरंग पुनियाने म्हटलं आहे.

यूपी गेटवर पोहोचलेले भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांना दिल्ली सीमेवर प्रवेश करताना रोखण्यात आले आहे. यादरम्यान राकेश टिकैतने दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना दिल्लीच्या हद्दीत येऊ दिले नाही. यानंतर त्यांनी यूपी गेट फ्लायओव्हरखाली पंचायत घेण्यास सांगितले आहे.