जीएसटी रिटर्न न भरल्यास होणार कारवाई; पुढील आठवड्यात निघणार अधिसूचना?
GST | Representational Image | (Photo Credits: PTI)

जीएसटी रिटर्न (GST Return) न भरणाऱ्या व्यावसायिकांवर सरकारची करडी नजर असणार आहे. त्यामुळे अशा व्यावसायिकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच आता सलग दोनवेळा जीएसटी रिटर्न न भरणारे व्यावसायिक आपले 'ई-वे बिल' काढू शकणार नाहीत. लाईव्ह हिंदूस्तानने दिलेल्या वृत्तानुसार, अर्थ मंत्रालयाकडून पुढील आठवड्यात यावर एक अधिसूचना जारी करण्यात येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सरकार जून महिन्यापासून हा निर्णय लागू करणार होते. पंरतु, व्यावसायिकांच्या वाढत्या अडचणींमुळे सरकार ते टाळत होते. (हेही वाचा - वाहन खरेदी होणार आणखी स्वस्त?; अर्थसंकल्पात GST 28 वरून 18 टक्के होण्याची शक्यता)

देशात 9 नोव्हेंबर 2019 पर्यंत 22 लाख व्यावसायिकांनी रिटर्न भरलेले नाहीत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी पुढील महिन्यापासून जीएसटी संकलनात वाढ होण्याची आशा व्यक्त केली होती. जीएसटी रिटर्न न भरल्याने व्यावसायिकांच्या अडचणी वाढणार आहेत. रिटर्न दाखल न झाल्यास व्यावसायिक ई-वे बिल काढू शकणार नाहीत. केंद्र सरकार लवकरच यावर अधिसूचना जारी करण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - टीव्ही, वॉशिंग मशीन यांसारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांवरील GST मध्ये घट

भारतात जीएसटी रिटर्न भरणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. ऑगस्ट महिन्यातील जीएसटीचं कलेक्शन 1 लाख कोटी रुपयांपेक्षा खाली आलं होत. महसूल विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ऑगस्टमध्ये फक्त 98 हजार 203 कोटी रुपये जीएसटी कलेक्शन करण्यात आलं. त्यामुळे केंद्र सरकारला हा मोठा झटका असल्याचं बोललं जात होतं.