भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) आणि महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (MTNL) या कंपन्यांची परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांचं वेतन अद्यापही, दोन्ही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना मिळालेलं नाहीये. दिवाळीपर्यंत सुद्धा परिस्थिती अशीच राहिली, तर दिवाळीनंतर देशव्यापी संपावर जाण्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे.
'दिवाळी इतक्या जवळ आलेली असताना कामगारांना दोन महिने वेतनापासून वंचित ठेवणे चुकीचे आहे. आम्हाला वेतन मिळाले नाही तर आम्ही पंतप्रधान कार्यालयात हा मुद्दा घेऊन जाऊ,' असे MTNL च्या कर्मचारी संघटनेचे धर्मराज सिंग म्हणाले.
तर, BSNLच्या कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष के सबॅस्टिअन यांनी 'आपणही MTNL कर्मचाऱ्यांसोबत संप करू' असे म्हणतानाच 'दोन्ही कंपन्यांच्या पुनरुज्जीवनाबाबत सरकारच्या डोक्यात नेमकं काय आहे',असा सवालही उपस्थित केला. दूरसंचार मंत्र्यांचं पुनरुज्जीवनाच्या बाबत पंतप्रधान कार्यालयासोबत झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. दोन्ही कंपन्यांचं विलीनीकरण करण्याच्या मुद्द्याला कर्मचाऱ्यांनी विरोध केला आहे. तसेच सेवानिवृत्तीचं वय 60 वर्षांवरून 50 वर्षे करण्यात यावं असंही त्यांचं म्हणणं आहे.
काही दिवसांपूर्वी अर्थ मंत्रालयाकडून या दोन्ही कंपन्या बंद करण्याचा सल्ला देण्यात आला होता. दोन्ही कंपन्या बंद करण्यासाठी लागणारा खर्च हा 95000 कोटींपेक्षा नक्कीच कमी असेल, असेही दूरसंचालनालयाने म्हटले होते. 1.65 लाख कामगारांची ऐच्छिक सेवानिवृत्ती तसेच कंपन्याचे कर्ज यांचा अभ्यास करून 95000 कोटी होतील असे अनुमान करण्यात आले होते.