Prime Minister Narendra Modi (PC - Twitter)

BJP Foundation Day 2021: भाजपने निवडणूक जिंकली तर त्याला निवडणूक जिंकणारी मशीन असं म्हणतात. परंतु जेव्हा इतर पक्ष भाजपला हरवतो, तेव्हा त्यांची मात्र वाहवाह केली जाते. जे लोक भाजपाचे निवडणूक जिंकण्याचे मशीन म्हणून वर्णन करतात. त्यांना भारताची परिपक्व लोकशाही समजत नाही. भाजपा निवडणुका जिंकण्यासाठी मशीन नसून लोकांची मने जिंकणारा पक्ष आहे. आम्ही सत्तेत असू किंवा नसू आम्ही पाच वर्षे कठोर परिश्रम करतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या (PM Narendra Modi) 41 व्या स्थापना दिनी (BJP Foundation Day) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.

पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले की, भाजप घराणेशाहीच्या विरोधात आहे. सबका साथ, सबका विकास, प्रत्येकाचा विश्वास यावर भाजपचा विश्वास आहे. देशातील शेवटच्या माणसापर्यंत आणि शेवटच्या प्रदेशात पोहोचण्यासाठी पक्षाचा अविरत संघर्ष सुरू आहे. केरळ आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यात आमच्या कार्यकर्त्यांना धमकावले जाते. त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबियांवर हल्ला केला जातो. (वाचा - इंडियन मेडिकल असोसिएशनचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र; 18 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यास परवानगी देण्याची केली मागणी)

देशासाठी जगण-मरण, एखाद्या विचारसरणीला चिकटून राहणे, हे भाजप कार्यकर्त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्याच बरोबर, एकविसाव्या शतकातील भारतामध्येही वंशवाद आणि परिवारवाद पाहिला जातो. मात्र, आमचा मंत्र 'व्यक्तीपेक्षा मोठा पक्ष आणि पक्षापेक्षा मोठा देश'. ही परंपरा आजही कायम आहे. आम्ही श्यामा प्रसाद मुखर्जी (वन इंडिया) चा दृष्टिकोण पूर्ण केला. कलम 370 रद्द करून काश्मीरला घटनात्मक अधिकार दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे बोलताना म्हणाले की, सध्या देशात सीएए, कृषी विधेयकाच्या नावावर राजकारण केले जात आहे. या मुद्दयावरून राजकारण करणारे लोक आपला पराभव लपवण्यासाठी अशा स्वरुपाची टीका करत आहेत. परंतु आपण सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, असंही नरेंद्र मोदी यावेळील म्हणाले.