LPG Gas Leak: घरगुती गॅस गळतीमुळे लागली आग, आई आणि 3 मुलांचा होरपळून मृत्यू
Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

बिहारच्या (Bihar) मुझफ्फरपूर (Muzaffarpur) जिल्ह्यातील मीनापूर पोलीस ठाण्याच्या (Minapur Police Station) हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. दुध उकळत असताना एलपीजी गॅस सिलिंडरला (LPG Gas Cylinder) गळती झाली. ज्यामुळे घराला लागलेल्या आगीत एका महिलेसह तिच्या 3 मुलांचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवार घडली आहे. स्थानिक पोलिसांनी चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. तसेच याप्रकरणी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे.

मीनापूर ब्लॉकच्या नंदना गावातील प्रभाग क्रमांक 11 मध्ये सोमवारी रात्री अशोक साह यांच्या घरी एलपीजीवर दूध उकळले जात असताना ही घटना घडली आहे. यात अशोक साह यांच्या 3 मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, त्यांच्या पत्नीने एसकेएमसीएचमध्ये उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला आहे. मृतांमध्ये अशोक साह यांची पत्नी शोभा देवी, त्यांची मुलगी दीपांजली कुमारी (6), मुलगा आदित्य कुमार (4) आणि विवेक (3) यांचा समावेश आहे, अशी माहिती मुजफ्फरपूर (पूर्व) पोलीस उपअधीक्षक मनोज पांडे यांनी दिली आहे. हे देखील वाचा- Bihar Shocker: पतीने 500 रुपये 'हफ्ता' देण्यास दिला नकार; दोन पुरुषांनी केला त्याच्या पत्नीवर सामुहिक बलात्कार

पांडे यांच्या मते, साह दिल्लीतील एका खासगी कारखान्यात काम करतात आणि केवळ सहा महिन्यांपूर्वी येथून दिल्लीला गेले होते. छठ उत्सवानिमित्त ते घरी येणार होते. या घटनेची माहिती साह यांना देण्यात आली आहे. पोलिसांनी चार मृतदेह ताब्यात घेतले असून त्यांना शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आली असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जात आहे. पोलीस उपअधीक्षकांनी आश्वासन दिले आहे की या घटनेची माहिती जिल्हा प्रशासनालाही देण्यात आली आहे, सरकारी तरतुदीनुसार जे काही मदत असेल ते देण्याचा प्रयत्न केला जाईल.