छत्तीसगढमधील दुर्ग जिल्ह्यातील भिलाई स्टील प्लांटमध्ये गॅस पाईपलाईनचा स्फोट होऊन मोठी दुर्घटना मंगळवारी घडली. या दुर्घटनेत सुमारे ११ कर्मचारी ठार झाले. तर, काही कर्मचारी गंभीर जखमी झाले. जखमी कर्मचाऱ्यांना जवळच्या रुग्णालया उपचारासाठी तातडने दाखल करण्यात आले आहे. ज्या प्लांटमध्ये ही दुर्घटाना घडली तो प्लांट राजधानी रायपूरपासून अवघ्या ३० किमी अंतरावर आहे. तसेच, या प्लांटवर स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाची नजर असते. स्फोट होताच प्लांटला मोठी आग लागली. अपघाताची माहिती कळताच अग्नि शमन दलाचे सहाहून अधिक बंब घटनास्थळावर दाखल झाले.
दरम्यान, सांगितले जात आहे की, भिलाईच्या ज्या प्लांटमध्ये गॅस पाईपलाईनचा स्फोट झाला, त्या पाईपलाईनची साफसफाई आणि डागडुजी करण्याचे काम मंगळवारी सुरु होते. हे काम सुरु असतानाच अचानक स्फोट झाला. दरम्यान, दुर्ग जिल्ह्याचे पोलिस महानिरीक्षक जीपी सिंह यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, स्टील प्लांटमध्ये झालेल्या स्फोटात ११ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर, १० ते १५ कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यातील काहींची स्थिती गंभीर आहे. या प्लांटमध्ये एकूण २५ कर्मचारी ओव्हनजवळ काम करत होते. नेमका त्याच वेळी स्फोट झाला.
दुर्घटनेची माहिती मिळताच दुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी उमेश अग्रवाल, आयजी पोलीस जीपी सिंह आणि एसएसपी घटनास्थळावर तातडीने दाखल झाले. त्यांनी प्रशासनाला बचाव आणि मदतकार्याचे आदेश दिले. सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, प्लांटमध्ये सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापण या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केल्याने हा अपघात घडल्याची चर्चा आहे.