Air India Flight (Photo Credits: ANI)

Air India: ‘एअर इंडिया’ कंपनीने आपल्या 48 वैमानिकांना नारळ दिला आहे. गेल्या वर्षी या वैमानिकांनी कंपनीला आपला राजीनामा सोपवला होता. मात्र, या वैमानिकांना 6 महिन्यांचा नोटीस कालावधी पूर्ण करावा लागला होता. या कालावधीत त्यांनी आपले राजीनामे परत घेतले होते. एअर इंडियाने या वैमानिकांना राजीनामा परत घेण्यास स्वीकृती दर्शवली होती. मात्र, गुरुवारी कंपनीने अचानक या वैमानिकांच्या राजीनाम्याला स्वीकृती रद्द केली.

कंपनीने या वैमानिकांना यासंदर्भात कोणतीही माहिती दिली नव्हती. त्यामुळे ते नेहमीप्रमाणे कामावर रुजू झाले. मात्र, कामावर आल्यानंतर त्यांना ही बाब समजली. त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला. विशेष म्हणजे वैमानिक युनियनने सीएमडी आणि नागरी उड्डाण मंत्र्यांकडे यासंदर्भात पत्राद्वारे तक्रार केली आहे. (हेही वाचा - Coronavirus in India: भारतात 24 तासांत 65,002 नवे रुग्ण तर 996 मृत्यू; कोरोना बाधितांचा आकडा 25,26,193 वर)

दरम्यान, लॉकडाऊन काळात एअर इंडिया कंपनीचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. आर्थिक अडचणीमुळे कंपनीने काही कर्मचाऱ्यांना पगाराशिवाय 5 वर्षांच्या सुट्टीवर पाठवले होते. कंपनीने वैमानिकांना बेकायदेशीरपणे सेवेतून बडतर्फ केल्याचे ‘इंडियन कमर्शिअल पायलटस असोसिएशन’ने (ICPA) म्हटले आहे. त्यामुळे आयसीपीएकडून सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.