Agra Shocker: उत्तर प्रदेशमध्ये 10 लाखांच्या खंडणी(Ransom)साठी एका 24 वर्षीय तरुणाचे अपहरण(Kidnapping)करून त्याची हत्या (Murder)केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील आग्रा येथील मालपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कथित घटना घडली आहे. पोलिस अधिका-यांनी सांगितले की, पीडित तरूणाला मागितलेली १० लाख रुपयांची खंडणी न दिल्याने आरोपींनी तरुणाची हत्या केली. (हेही वाचा: Rajasthan Earthquake: राजस्थानच्या सीकरमध्ये मध्यरात्री भूकंपाचे धक्के; 3.9 रिश्टर स्केलची तीव्रता )
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, मृत व्यक्तीचे नाव सुशील कुमार असे असून तो नागले हत्ती गावचा रहिवासी होता. आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले असले तरी अद्याप त्यांना पीडित तरुणाचा मृतदेह सापडला नाही. पोलिसांनी मुख्य आरोपी राहुल जोशी याच्यासह तिघांना अटक केली आहे. अपहरण आणि खुनाच्या आरोपाखाली सर्वांना अटक करण्यात आली आहे.
चौकशीदरम्यान, पोलिसी खाक्या दाखवताच संशयितांनी अपहरण आणि हत्येच्या गुन्ह्याची कबूली दिली. रविवारी, 2 जून रोजी ही घटना घडली, जेव्हा सुशील कुमार याला आरोपींनी फोन करून नागला रेवती गावात येण्यास सांगितले.
त्यानंतर सुशीलची आई भुरी देवी यांना एका अनोळखी नंबरवरून फोन आला. फोनवर भुरी देवी यांना तिच्या मुलाचे अपहरण झाल्याची सांगितले आणि त्याच्या सुटकेसाठी 10 लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिस ठाणे गाठले. परंतु पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर बुधवारी, ५ जून रोजी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला.
आपल्या मुलाचे कोणाशीही वैर नव्हते, असे भुरी देवी यांनी तक्रारीत म्हटले होते. त्याशिवाय, पोलिसांनी त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचे म्हटले. त्यामुळे त्यांच्या मुलाला जीव गमवावा लागला. याप्रकरणी पोलिसांच्या दुर्लक्षामुळे संतप्त ग्रामस्थांनी मालपुरा पोलिस ठाण्याला घेराव घातला आणि आंदोलन केले.