Surgery (Photo credit- IANS)

Woman Dies During Surgery in Bihar: बिहार (Bihar) मध्ये वैद्यकीय निष्काळजीपणाची घटना समोर आली आहे. शनिवारी डॉक्टरांच्या अनुपस्थितीत समस्तीपूर जिल्ह्यातील एका खाजगी क्लिनिकच्या कंपाउंडर (Compounder) ने केलेल्या अयशस्वी नसबंदी शस्त्रक्रियेदरम्यान (Sterilization Surgery) एका 28 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. बबिता देवी असं या महिलेचं नाव आहे. बबिता देवाच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांनी क्लिनिकमध्ये गोंधळ घातला. या घटनेनंतर कंपाउंडर तेथून पळून जाण्यात यशस्वी झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजधानीपासून सुमारे 80 किमी अंतरावर असलेल्या जिल्ह्यातील मुसरीघरी शहरातील प्रभाग 14 मधील रहिवासी असलेल्या बबिता यांना शनिवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास पटोरी रोडवरील अनिशा हेल्थ केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. सुरुवातीला कंपाउंडर व इतर कर्मचाऱ्यांनी क्लिनिकमध्ये डॉक्टर नसल्याचे कुटुंबीयांना सांगितले. (हेही वाचा - धक्कादायक! मध्य प्रदेशमध्ये मोबाईलच्या प्रकाशात केली 37 महिलांची नसबंदी शस्त्रक्रिया; ऑपरेशननंतर जमिनीवर झोपवले (Video))

तथापी, काही वेळानंतर कंपाउंडरने कुटुंबातील सदस्यांना खात्री दिली की, तो शस्त्रक्रिया करू शकतो. त्यानंतर महिलेला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. मात्र शस्त्रक्रियेदरम्यान तिची प्रकृती बिघडली. त्यानंतर तिला तिच्या कुटुंबीयांच्या संमतीशिवाय तिथून सुमारे 10 किमी दूर असलेल्या दुसऱ्या खाजगी वैद्यकीय आस्थापनात हलवण्यात आले. (हेही वाचा - Family Planning Surgery: धक्कादायक! हैद्राबादमध्ये शिबिरात केलेल्या नसबंदीनंतर 4 महिलांचा मृत्यू)

दुसऱ्या क्लिनिकमध्ये तिला मृत घोषित करण्यात आले, त्यानंतर महिलेचा मृतदेह पुन्हा केंद्रात आणण्यात आला. जेव्हा तिच्या कुटुंबीयांना महिलेच्या मृत्यूची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी अनिशा हेल्थ केअरच्या बाहेर आंदोलन करण्यास सुरुवात केली. तसेच शस्त्रक्रिया करणाऱ्या कंपाउंडरला क्लिनिकच्या मालक-कम-डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना त्वरित अटक करण्याची मागणी केली.