लग्न, आयुष्याच्या टप्प्यांमधील एक महत्वाचे वळण. लग्न ही एक अशी गोष्ट आहे ज्यासाठी कित्येक वर्षांपासून स्वप्ने रंगवली जातात. योजना आखल्या जातात. लग्नात कोणते कपडे घालावे यापासून ते लग्न कुठे व्हावे त्या ठिकाणापर्यंत सर्व गोष्टींच्या प्रत्येकाच्या स्वतःच्या अशा कल्पना असतात. म्हणूनच होणाऱ्या लग्नाला आठवणीमध्ये कैद करण्यासाठी अनेक फंडे वापरले जातात. यासाठी आधी लग्नाच्या फोटोंचे अल्बम हे फार मोठे आकर्षण असायचे, मात्र आता या डिजिटल युगात लग्नाचे प्री-व्हिडिओ-पोस्ट-व्हिडिओ अशा अनेक संकल्पना वापरल्या जातात. मात्र आता लग्नाची आठवण जपून ठेवण्यासाठी तयार कऱण्यात आलेल्या व्हिडीओत टी सीरिजची गाणी वापरणे तुम्हाला अडचणीत टाकू शकते. आपल्या गाण्यांच्या कॉपीराइटचे उल्लंघन होत असल्याचे सांगून अनेकांना नोटीस पाठवून, अशा 100 पेक्षा जास्त फोटोग्राफर्सवर गुन्हे दाखल केले आहेत.
कंपनीने आपली गाणी लग्नाच्या व्हिडीओमध्ये वापरल्याने हरियाणा, पंजाब, गुजरात, झारखंड आणि दिल्ली येथील फोटोग्राफर्सवर अशा प्रकारचे कॉपीराइटचे उल्लंघन केल्याचे गुन्हे दाखल केले आहेत. तसेच हरियाणामधील 30 फोटोग्राफर्सना नोटीस पाठवली आहे. मात्र टी सिरीजच्या या निर्णयाला जवळजवळ 50 हजार फोटोग्राफरर्सनी आपला विरोध दर्शवला आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे या व्हिडीओच्या व्यवसायावर नकारात्मक परिणाम होईल अथवा नाईलाजाने या व्हिडीओ बनवण्याच्या प्रक्रियेचे रेट्स वाढवावे लागतील असे या फोटोग्राफरर्सचे म्हणणे आहे.
गाणी वापरायची असल्यास परवाना घ्यावा लागेल अशी भूमिका कंपनीने घेतली आहे. मात्र परवाना घेणे ही फार सोपी गोष्ट नाही. तसेच प्रत्येक कंपनीने अशी भूमिका घेतल्यास प्रत्येक कंपनीकडून अशा प्रकारचे परवाने घेणे हे शक्य नसल्याचे हरियाणा फोटोग्राफर संघाचे म्हणणे आहे. 1957 च्या कॉपीराइट कलमानुसार अशा प्रकारचे उल्लंघन झाल्यास 3 वर्ष कैद आणि 2 लाख दंड अशी शिक्षा सांगितली आहे. त्यामुळे याबाबत असोसिएशन आणि टी सीरिजमध्ये चर्चा सुरु असून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरु आहे.