Bengaluru Water Crisis: बेंगळुरूमध्ये पिण्याच्या पाण्याने गाड्या धुतल्याने 3 दिवसांत 22 जणांना 1.1 लाख रुपयांचा दंड
washing car (PC - Pixabay)

Bengaluru Water Crisis: बेंगळुरू (Bengaluru) पाणी पुरवठा आणि सीवरेज मंडळाने (BWSSB) कावेरी नदी (Kaveri River) चे पिण्यायोग्य पाणी कार धुण्यासाठी वापरल्याने तीन दिवसांत 22 जणांकडून 1.1 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. BWSSB ने 10 मार्च रोजी एक नोटीस जारी करून, पिण्याच्या पाण्याच्या वापराच्या उल्लंघनासाठी 5,000 रुपयांच्या दंडाची माहिती जनतेला दिली होती. यामध्ये कार धुणे, बागकाम आणि मोठे बांधकाम प्रकल्प यासारख्या गोष्टींसाठी पिण्याचे पाणी वापरल्यास दंड आकारण्यात येईल, असंही सांगितलं होतं.

BWSSB चे अध्यक्ष व्ही राम प्रसथ मनोहर यांनी TOI ला सांगितले की, सध्या बेंगळुरू शहराला जलसंकटाचा सामना करावा लागत आहे. आम्ही जनजागृती केल्यानंतर शुक्रवारपासूनच निर्बंधांच्या आदेशांची अंमलबजावणी सुरू केली. शुक्रवार ते आज (रविवार) दरम्यान आम्ही 22 प्रकरणे नोंदवली आहे. पिण्याच्या पाण्याचा वापर गाडी धुण्यासाठी केल्याने लोकांकडून दंड वसूल करण्यात आला असून त्यांना दंडाच्या पावत्या देण्यात आल्या आहेत. (हेही वाचा -Bengaluru Water Crisis: बेंगळुरूमध्ये भीषण जलसंकट, गेल्या ३-४ महिन्यांपासून पाण्यासाठी वणवण)

अंमलबजावणीच्या पहिल्या टप्प्यात कार वॉशिंगवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. लोक थेट नळांना जोडलेल्या फवारण्या वापरत आहेत. यामुळे भरपूर पाणी वाया जात आहे. स्थानिक रहिवाशांनी यासंदर्भात तक्रार नोंदवली आहे. त्यानुसार, संबंधितावर आम्ही कारवाई केली आहे, असंही BWSSB अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केलं. (वाचा - Bengaluru Water Crisis: बेंगळुरू करत आहे भीषण जलसंकटाचा सामना; ऑनलाईन सुरु झाल्या शाळा-कोचिंग, टँकरच्या किमती दुप्पट, जाणून घ्या परिस्थिती)

BWSSB नुसार, बहुतेक प्रकरणे बोर्डाच्या आग्नेय विभागातून आली आहेत. तर उर्वरित13 प्रकरणे पूर्व, उत्तर, ईशान्य आणि नैऋत्य विभागांमध्ये पसरलेली आहेत.