'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या फॅन्ससाठी मोठी खूशखबर, 'दयाबेन' दिशा वकानी  मालिकेत परत येणार
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Image (File Photo)

तारक मेहता का उल्टा चष्मा (Tarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेपासून गेले काही महिने दूर असणारी दिशा वकानी  (Disha Vakani) लवकरच मालिकेत पुनरागमन करणार आहे. या मालिकेत दिशा वकानी साकरत असलेलं 'दयाबेन' (Dayaben) या पात्राने तिला देशभरात घराघरामध्ये ओळख मिळवून दिली आहे. नुकत्याच एका पुरस्कार सोहळ्यामध्ये मालिकेचे लेखक शैलेश लोढा यांनी दिलेल्या माहितीनुसार दिशा मालिकेत लवकरच कमबॅक करणार आहे. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्येही शेलेश यांनी दिशाच्या कमबॅकचे संकेत दिले आहेत.

दिशा वकानीला मालिकेमध्ये पुनरागमन करण्यासाठी 30 दिवसांचा कालावधी दिला होता. अन्यथा दिशाऐवजी इतर अभिनेत्रीचा विचार केला जाईल अशी माहिती देण्यात आली होती. पण दिशाने मालिकेत पुनरागमन करण्याचा निर्णय घेत टीम आणि चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.

तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका मागील अनेक वर्षांपासून टीआरपीमध्ये अव्वल होती. गरोदरपणाच्या काळामध्ये दिशा वाकनी मालिकेपासून दूर झाली होती. त्यानंतरही मुलीला सांभाळणं, घर सांभाळणं आणि 12-13 तासांचं शूटिंग असं गणित सांभाळणं कठीण होत असल्याने तिने मालिकेपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.