चला हवा येऊ द्या कार्यक्रमातील कलाकार निलेश साबळे, कुशल बद्रिके आणि भाऊ कदम यांच्या विरोधात संभाजी ब्रिगेडची पोलिसात तक्रार
चला हवा येऊ द्या (Photo credits: Wikimedia Commons)

झी मराठीवरील (Zee Marathi) चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) या लोकप्रिय कार्यक्रमाने संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. मात्र आता या कार्यक्रमातील काही कलाकार वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या या विनोदी कार्यक्रमातील एका भागात राजर्षी शाहू महाराज (Shahu Maharaj) आणि सयाजीराव गायकवाड (Sayajiraje Gaikwad) यांचा फोटो मार्फ करुन वापरण्यात आला होता. त्यात शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांच्याऐवजी तेथे भाऊ कदम व कुशल बद्रिके यांचा फोटो दाखवण्यात आला होता. त्यावरुन आपेक्ष घेत संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापूर येथील विजापूर नाका पोलिस स्टेशनमध्ये धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

चला हवा येऊ द्या मधील कलाकार निलेश साबळे (Nilesh Sable), कुशल बद्रिके (Kushal Badrike) आणि भाऊ कदम  (Bhau Kadam) यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून या कलाकारांनी तसेच झी वाहिनीने याबद्दल जाहीर माफी मागावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. (चला हवा येऊ द्या च्या वतीने निलेश साबळे याचा प्रकट माफीनामा; महापुरुषांचा अपमान करण्याचा कधीच हेतू नव्हता म्हणत मागितली क्षमा)

यापूर्वी फोटोवरुनच आपेक्ष घेत छत्रपती संभाजी राजे यांनी महापुरुषांचा अपमान केल्याचे म्हटले होते. तसंच निलेश साबळे यांच्या डोक्यात लोकप्रियतेची हवा गेल्याने ते असे वागत आहेत. या सर्व प्रकाराबद्दल कलाकरांनी आणि झी वाहिनीने जाहीर माफी मागावी अशा आशयाचे ट्विटही त्यांनी केले होते. त्यानंतर झी वाहिनीच्या सोशल मीडिया हँडलवरुन निलेश साबळे याने व्हिडिओ शेअर करत माफी मागितली होती.