एकता कपूरची (Ekta Kapoor) ‘क्योंकि सास भी कभी बहू थी‘ (Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi) ही मालिका हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय मालिकांपैकी एक ठरली. या मालिकेने यशाचे अनेक विक्रम मोडले. सध्याच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना याच मालिकेने रातोरात स्टार बनवले. आता माहिती मिळत आहे की, 22 वर्षांपूर्वी भारतीय टेलिव्हिजनवर प्रसारित झालेला आयकॉनिक शो 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' 16 फेब्रुवारीपासून छोट्या पडद्यावर परत येत आहे.
ही मालिका शोभा कपूर आणि एकता कपूर यांची निर्मिती असलेली टीव्हीवरील सर्वात जास्त काळ चालणारी टीव्ही मालिका होती. या शोमध्ये अमर उपाध्याय आणि स्मृती इराणी मुख्य भूमिकेत होते. 'क्यूंकी...' चा पहिला भाग 3 जुलै 2000 रोजी प्रसारित झाला व पुढे आठ वर्षे चाललेल्या या शोचे सुमारे 1,800 भाग प्रसारित झाले. या टीव्ही मालिकेने भारतीय टेलिव्हिजनचा चेहरामोहराच बदलून टाकला. आता हा शो पुन्हा एकदा ऑन एअर होणार असल्याची घोषणा होताच, या शोच्या सीझन 2 चीही लवकरच घोषणा होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
View this post on Instagram
एकता कपूरच्या 'क्यूंकी सास भी कभी बहू थी'ने स्मृती इराणींना घरोघरी पोहोचवले. छोट्या पडद्यावरील ‘तुलसी’ भारताची मुलगी बनली होती. लोकांनी फक्त तुलसीलाच नाही तर संपूर्ण विराणी कुटुंबाला प्रेम दिले, म्हणूनच जेव्हा एकता कपूरने शोमध्ये तुलसीचा नवरा मिहिरचा मृत्यू दाखवला तेव्हा, लोकांनी त्याचा तीव्र निषेध केला. अनेकांनी एकता कपूरला पत्रे लिहून, फोन करून मिहीरला पुन्हा घेण्याची मागणी केली होती. त्यानंतर एकता कपूरलाही लोकांसमोर हार मानावी लागली आणि 'पब्लिक डिमांड'वर मिहिरला शोमध्ये परत आणण्यात आले. (हेही वाचा: प्रतीक्षा संपली! 'या' तारखेला रिलीज होणार अजय देवगणची पहिली वेब सीरिज 'रुद्र', पाहा नवा ट्रेलर)
नुकतेच एकताने 'क्योंकी सांस भी कभी बहू थी' चा प्रोमो शेअर केला आहे, ज्यामध्ये विराणी कुटुंबाची सून ‘तुलसी’ तिच्या घरी सर्वांचे स्वागत करताना दिसत आहे. एकता कपूरने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'या प्रोमोची एक झलक पाहून जुन्या आठवणी ताज्या झाल्या. बुधवारपासून, दररोज संध्याकाळी 5 वाजता फक्त स्टार प्लसवर. एकताने तिच्या पोस्टमध्ये स्मृती इराणी, अमर उपाध्याय आणि रोनित रॉय यांनाही टॅग केले आहे. प्रोमोवरून दिसत आहे की या रिपीट टेलीकास्ट उद्यापासून सुरु होत आहे.