Taarak Mehta Ka Ooltah Chashmah (Photo Credits: File Photo)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) वाढता धोका लक्षात घेता सरकारने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहे. कोरोना विषाणूंचा फैलाव रोखण्यासाठी गर्दी टाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालयं, जीम, स्विमिंग पूल्स, थिएटर्स, मॉल्स बंद ठेवण्यात आले आहेत. त्याचबरोबर सिनेमा, मालिकांचे शूटिंगही बंद करण्यास सांगितले आहे. मात्र या गंभीर परिस्थितीतही सब टीव्ही वरील 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या लोकप्रिय मालिकेच्या निर्मात्यांनी सरकारकडे एक अजब मागणी केली आहे. मर्यादीत स्टाफ युनिटसह आम्हाला शूटिंगची परवानगी द्या, असे पत्र मालिकेचे निर्माते असित मोदी (Asit Modi) यांनी ट्विटरवर शेअर केले आहे. (अमेय खोपकर यांच्या इशाऱ्यानंतर 'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेकडून माफीनामा)

"सर, आम्हाला तुमच्या नियमांचे परिपत्रक मिळेल का? सर्व ठिकाणी आणि फिल्मसिटीमध्ये सुरु असणारे शूटिंग बंद केले आहे का? आजपासून MIDC, SEZ, फॅक्टरीज तसंच सरकारी आणि खाजगी ऑफिसेस बंद आहेत का? कृपया आम्हाला माहिती द्या. आम्ही सरकारने सांगितलेल्या नियमांचे पालन करत असून खबरदारीही घेत आहोत. तर आम्ही मर्यादीत स्टाफ युनिटसह शूटिंग करु शकतो का?," असे ट्विट तारक मेहताचे निर्माते असित मोदी यांनी केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी BMC ला टॅग केले आहे. असित यांच्या या ट्विटवर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रीया पाहायला मिळत आहेत.

असित मोदी यांचे ट्विट:

राज्यात 39 कोरोनाग्रस्त असून ही संख्या अधिक वाढू नये म्हणून सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. त्यातच तारक मेहता मालिकेच्या निर्मात्यांची ही मागणी चक्रावून टाकणारी आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यात वर्क फ्रॉम होमची मुभा देण्यात आली आहे.