कोरोना विषाणूच्या लॉकडाऊन (Coronavirus Lockdown) मध्ये लोकग्रहास्तव महाभारत (Mahabharata) आणि रामायण (Ramayana) सारख्या मालिका परत दाखवल्या गेल्या. इतकेच नाही तर रामायणने जागतिक विक्रमदेखील बनवला. रामायण आणि महाभारतासारख्या सीरियलशी संबंधित एक विचित्र प्रकरण समोर येत आहे. हैदराबादमधील एका डॉक्टरने असे म्हटले आहे की, रामायण, महाभारतामुळेच गेल्या 40 दिवसात हैदराबाद व आसपासच्या भागातील सुमारे 12 मुलांची दृष्टी गेली आणि 25 जण जखमी झाले आहेत. हैदराबादमधील रूग्णालयात अशी तब्बल 25 प्रकरणे नोंदवली गेली आहेत, ज्यात बाणामुळे मुलांच्या डोळ्याला खोल दुखापत झाली आहे.
यापैकी सरोजिनी देवी नेत्र रुग्णालय आणि एलव्ही प्रसाद नेत्र रुग्णालयात (LVP) 12 प्रकरणे नोंदविण्यात आली आहेत. हैदराबादमधील डॉक्टरांचे म्हणणे आहे की, या मालिका मुलांमध्येही खूप लोकप्रिय झाल्या आणि मुले त्यांची नकल करत टीव्ही पाहताना धनुष्यबाणांचा खेळ खेळू लागले, ज्यामुळे बाणामुळे अनेक मुलांना दुखापत झाली. एलव्हीपीईआय मधील रेटिना इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. सुभद्रा जलाली म्हणाल्या, ‘दोन दशकांपूर्वी रामायण जेव्हा प्रसारित केले गेले तेव्हाही अशा अनेक घटना घडल्या होत्या, ज्यामध्ये धनुष्य व बाणामुळे दुखापत झाली होती. जवळपास 15 वर्षे आम्ही अशा केसेस पहिल्या नाहीत, मात्र आता ही संख्या पुन्हा वाढू लागली आहे. (हेही वाचा: 'रामायण'ने तोडले आतापर्यंतचे सर्व विक्रम; स्टार प्लस, झी टीव्हीच्या मालिकांना मागे टाकून TRP मध्ये ठरला अव्वल)
धनुष्य-बाण खेळामुळे जखमी झालेल्या मुलांमध्ये शमशाबादमधील रहिवासी असलेला एक सात वर्षांचा मुलगाही आहे. झाडू आणि नारळाच्या झावळीने बाण बनवून मुले हा खेळ खेळत आहेत. अशातच या मुलाच्या डोळ्यातील रेटीनाना दुखापत झाली. शस्त्रक्रिया करूनही डोळयातील पडदा दुरुस्त होऊ शकला नाही व या मुलाची दृष्टी गेली. दरम्यान, रामायणने एक अनोखा विश्वविक्रम करत, हा जागतिक स्तरावर सर्वाधिक पहिला गेलेला मनोरंजन कार्यक्रम ठरला आहे. प्रसार भारतीने याबाबत माहिती दिली आहे.