चीनमधील कोरोना विषाणू हळू हळू संपूर्ण जगात पसरला, त्यानंतर अनेक देशांनी लॉक डाऊन जाहीर केले. अशात व्यवसाय, उद्योग धंदे, शुटींग ठप्प झाले. या गोष्टीचा फायदा घेत टेलिव्हिजनवर जुन्या मालिका पुन्हा एकदा पहायची संधी प्राप्त झाली व याच्यात अव्वल होती ती दूरदर्शन वरील रामायण (Ramayan). आता रामायणने एक अनोखा विश्वविक्रम (Ramayan World Record) केला आहे. रामायण हा जागतिक स्तरावर सर्वाधिक पहिला गेलेला मनोरंजन कार्यक्रम ठरला आहे. प्रसार भारतीने याबाबत माहिती दिली आहे.
आपल्या ट्विट मध्ये प्रसार भारतीने म्हटले आहे, ‘रामायणने विश्वविक्रम निर्माण केला आहे. हा कार्यक्रम जागतिक स्तरावर सर्वाधिक पाहिलेला मनोरंजन कार्यक्रम ठरला आहे. या महिन्याच्या 16 तारखेला एका दिवसात तब्बल 77 दशलक्ष लोकांनी हा कार्यक्रम पाहिला. 28 मार्चपासून दूरदर्शनवर ही मालिका पुन्हा प्रसारित होत आहे.’
Ramayan World Record - Highest Viewed Entertainment Program Globally#IndiaFightsCorona#IndiaFightsBack pic.twitter.com/RdCDehgxBe
— Prasar Bharati (@prasarbharati) April 28, 2020
16 एप्रिल रोजी, रात्री 9 वाजता 77 मिलिअन लोकांनी हा कार्यक्रम पहिला आहे.
लॉक डाऊन सुरु झाल्यावर लोकांच्या आग्रहास्तव दूरदर्शनने रामायण हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मालिकेने पुन्हा एकदा आपली लोकप्रियता सिद्ध केली आहे. रामायणने 2015 पासूनचे टीआरपीचे सर्व विक्रम मोडीत काढून या टीआरपीच्या यादीमध्ये अव्वल स्थान पटकावले. स्टार प्लस, झी टीव्ही अशा अनेक वाहिन्यांच्या मालिकांना रामायणने मागे टाकले होते. आता रामायण हा नवीन विश्वविक्रम स्थापित केला आहे. (हेही वाचा: 'रामायण'ने तोडले आतापर्यंतचे सर्व विक्रम; स्टार प्लस, झी टीव्हीच्या मालिकांना मागे टाकून TRP मध्ये ठरला अव्वल)
दरम्यान, रामायण हा कार्यक्रम 18 एप्रिल रोजी संपला. रामायणाच्या विक्रमी यशानंतर दूरदर्शनने आता ‘उत्तर रामायण’ म्हणून ओळखल्या जाणार्या, लव्ह-कुशचे प्रसारण सुरु केले आहे.