कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी देशात 21 दिवसांसाठी, 14 एप्रिलपर्यंत लॉक डाऊन घोषित करण्यात आले आहे. अशावेळी नियमित चालणाऱ्या मालिकांचे शुटींग थांबल्याने लोकांच्या आग्रहास्तव काही गाजलेल्या जुन्या मालिकांचे पुनःप्रक्षेपण सुरु आहे. यामध्ये समावेश आहे तो रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ (Ramayan) मालिकेचा. आता मालिकेने पुन्हा एकदा आपली लोकप्रियता सिद्ध केली आहे. रामायणने 2015 पासूनचे टीआरपीचे सर्व विक्रम मोडीत काढून या यादीमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. रामायणने स्टार प्लस, झी टीव्ही अशा अनेक वाहिन्यांच्या मालिकांना मागे टाकले आहे.
90 चे ते दशक होते, टीव्हीवर रामायण सुरु झाल्यावर रस्ते ओस पडत असत. लोक टीव्हीची पूजा करायचे, टीव्हीला हार घातले जायचे. भारतीय टेलिव्हिजनवरील कदाचित इतर कोणत्या मालिकेला इतकी लोकप्रियता प्राप्त झाली असेल. आता लॉकडाऊनच्या काळात लोक घर आहेत अशावेळी सोशल मीडियावरून होत असलेल्या, लोकांच्या प्रचंड मागणीवरुन डीडी नॅशनलवर गोल्डन एज शो 'रामायण' परतला. आता हा शो टीआरपी खेचण्यात सर्वात यशस्वी ठरला आहे. (हेही वाचा: झी युवा वाहिनी वर 6 एप्रिलपासून सुरु होणार 1 तासाचा थरार, 'रात्रीस खेळ चाले- भाग 1' आणि 'एक घर मंतरलेलं' मालिका पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला)
2015 पासून, सामान्य करमणूक श्रेणी (मालिका) च्या दृष्टीने हा सर्वोत्कृष्ट शो बनला आहे. शोच्या टीआरपी रेटिंगविषयी माहिती डीडी नॅशनलचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर यांनी दिली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे, 'मला सांगण्यात खूप आनंद होत आहे की, दूरदर्शनवर प्रसारित होणारा ‘रामायण’ हा शो 2015 नंतरचा सर्वात जास्त टीआरपी खेचणारा हिंदी सामान्य मनोरंजन कार्यक्रम ठरला आहे.’ दरम्यान, रामायण नंतर शक्तिमान, ब्योमकेश बक्शी, फौजी, सर्कस, देख भाई देख, श्रीमान श्रीमती सारखे अनेक लोकप्रिय शो डीडी नॅशनलने प्रसारित करायला सुरुवात केली आहे.