Chandra Aahe Sakshila Serial: 'चंद्र आहे साक्षीला' मालिकेचा पहिला प्रोमो आला समोर, सुबोध भावे सह 'ही' अभिनेत्री दिसणार मुख्य भूमिकेत
Chandra Aahe Sakshila (Photo Credits: Instagram)

लॉकडाऊन दरम्यान बंद झालेल्या मालिका पुन्हा नव्या विषयांसह सुरु झाल्या आहेत. त्यात अनेक नवीन मालिका देखील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यातच्या गेल्या ब-याच दिवसांपासून चर्चेत असलेली अभिनेता सुबोध भावे याची मालिका 'चंद्र आहे साक्षीला' (Chandra Aahe Sakshila) चा पहिला प्रोमो समोर आला आहे. हा प्रोमो स्वत: सुबोध भावे (Subodh Bhave) याने दस-याच्या शुभमुहूर्तावर आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. येत्या 11 नोव्हेंबरपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सुबोध भावे पुन्हा एकदा छोट्या पडद्याच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज झाला आहे.

या मालिकेच्या टीजर मध्ये सुरुवातीला केवळ सुबोध भावेच दिसत होता. त्यामुळे यात त्याच्या सोबत कोणती अभिनेत्री झळकणार याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली होती. सुबोध भावे शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये या मालिकेतील अभिनेत्री देखील दिसत आहे. ऋतुजा बागवे (Rutuja Bagwe) ही अभिनेत्री या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. सुबोध भावे याच्या कान्हाज मॅजिक निर्मिती संस्थेच्या पहिल्यावहिल्या मालिकेचा प्रोमो आला समोर; सोशल मिडियावरून चाहत्यांना दिली बातमी

पाहा प्रोमो:

सुबोध भावे याने या पोस्टखाली सौ.सुमन आणि श्रीधर काळे 11 नोव्हेंबर पासून तुम्हाला भेटायला येत आहेत असे कॅप्शन लिहिले आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर सुबोधची नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

नुकतीच छोट्या पडद्यावर शुभमंगल ऑनलाइन ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अभिनेता सुबोध भावेच्या कान्हाज मॅजिक या निर्मिती संस्थेची ही पहिलीच मालिका आहे. त्यापाठोपाठ आता सुबोध भावे स्वत: काम करत असणारी नवीन मालिका घेऊन येत असल्याने त्याच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्यात प्रथमच सुबोध आणि ऋतुजा ही जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्यामुळे या मालिकेला घेऊन प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.