
आजच्या भागात अभिजित आणि रुपाली यांच्यामध्ये कप्तानपदासाठी टास्क रंगणार आहे. बिग बॉस रुपाली व अभिजित यांना त्यांच्या नष्ट झालेल्या वस्तू (टेडी आणि फोटो) देतात. या वस्तू घ्या आणि कप्तानपदासाठीच्या शर्यतीतून बाजूला व्हा असे सांगितले जाते. मात्र दोघेही या वस्तूंचा त्याग करून कप्तानपदासाठी टक्कर देण्याचा विचार करतात. दुसरीकडे वीणा, रुपाली आणि किशोरी यांचा ग्रुप पूर्णपणे तुटला असल्याचे जाणवत आहे. वीणाने शिवला जवळ केल्याने रुपाली आणि किशोरी यांना पुढे काय? असा प्रश्न पडला आहे.
रुपाली तशीही कणखर आहे, ती स्वतः एकटी हा खेळ खेळू शकते. मात्र इथे समस्या आहे ती किशोरीची. किशोरी पूर्णतः एकटी पडल्याचे स्पष्ट दिसत आहे. हीच संधी साधून वीणाची शत्रू हीना रुपालीला जवळ करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र रुपाली आणि किशोरी यांना वीणाचे वागणे प्रचंड खटकले आहे. तसेच वीणा स्वतःहून बोलत नसल्याने रुपाली रडवेलीही झाली आहे. ही गोष्ट दुसऱ्या ग्रुपच्याही लक्षात आल्याने ते संधी साधण्याचा मार्गावर आहेत. माधव हीनाला यापासून लांब राहण्याचा सल्ला देतो तर नेहाला ही ग्रुप पुन्हा एकत्र येऊ नये यासाठी प्रयत्न करण्याबद्दल बोलतो. (हेही वाचा: घरातील सदस्यांचे लाज आणणारे कृत्य, बिग बॉसने दिली मोठी शिक्षा; किचन बनले भांडणाचे रणांगण)
त्यानंतर बिग बॉसकडून टास्क दिला जातो. यामध्ये उमेदवारांना फोन खाली ठेवण्यास भाग पाडायचे आहे. यासाठी विरुद्ध टीम आणि समर्थक उमेदवारांना फोन करून काहीही बोलतील. उमेदवारांना ते सर्व ऐकून घ्यावे लागेल. इथे उमेदवारांच्या सहनशक्तीचा अंत पहिला जाणार आहे. प्रथम वैशाली रुपालीला फोन करून तिचा प्रचंड अपमान करते, मात्र रुपाली अजिबात ढळत नाही. त्यानंतर वीणा तिचे पुराण सुरु करते. शेवटी शिव तिला तिच्या भावाची शपथ देतो, मात्र रुपाली भावनिक होत नाही.
पुढे अभिजितला रूपालीचे समर्थक फोन करतात. इथे हे सर्व समर्थक त्यांचा वैयक्तिक राग उमेदवारांवर काढतात, किंवा समोरची व्यक्ती कुठे चुकत आहे हे पटवून सांगण्याचा प्रयत्न करतात. मात्र नक्की टास्क काय आहे? त्यामध्ये काय करायचे आहे ? याची सुतराम कल्पनाही या लोकांना नसल्याचे जाणवते. अखेर अभिजितने रुपालीपेक्षा जास्त वेळ फोनवरचे बोलणे ऐकल्याने त्याला 1 गुण मिळतो. शेवटी अभिजित या आठवड्यासाठी घराचा कप्तान होतो.