Bigg Boss Marathi 2, 8 July, Episode 44 Updates: घरातील सदस्यांचे लाज आणणारे कृत्य, बिग बॉसने दिली मोठी शिक्षा; किचन बनले भांडणाचे रणांगण
Bigg Boss Marathi 2 | (Photo Credits: Twitter)

अखेर कालच्या भागात सुरेखा पुणेकर बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्या. आजच्या भागाची सुरुवात किशोरी यांच्या रडण्याने होते. इतरांचे त्यांच्याबद्दल झालेले गैरसमज ऐकून त्यांच्या अश्रूंचा बांध  फुटतो. त्यावर रुपाली त्यांना समजावते. दुसरीकडे सुरेखा गेल्यामुळे इतरांनाही वाईट वाटल्याचे दिसते. रात्री परत किशोरी, वीणा आणि रुपाली यांच्याशी बोलायचा प्रयत्न करते मात्र इथे गुंता सुटायच्या ऐवजी तिघीही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करायला लागतात. अखेर रात्री किशोरी, अभिजित आणि वैशाली यांची माफी मागून जे काही गैरसमज आहेत ते मिटवण्याचा पुन्हा प्रयत्न करतात.

दुसऱ्या दिवशी सकाळी वीणा, शिव, अभिजित आणि वैशाली या आठवड्यातील नॉमिनेशन बद्दल चर्चा करत असता, त्यांना अशी चर्चा करण्याबद्दल मनाई असल्याचे सांगितले जाते. त्यानंतर बिग बॉस टीम A आणि टीम B ला ला Best Performer निवडण्यास सांगतात, ही नावे घरातील या आठवड्यासाठीच्या कप्तानपदासाठी एकमेकांशी लढतील. त्यानंतर दोन्ही टीम कडून रुपाली आणि अभिजित यांची नावे निवडली जातात.

त्यानंतर बिग बॉस सर्वांना एकत्रित बोलावतात, घरातील नियम मोडल्याने (दिवसा झोपणे, कुजबुज करणे, माईक न घालणे इ.) शिक्षा म्हणून बिग बॉस घरातील सदस्यांचे सर्व लक्झरी सामान जप्त करतात. घरात बाहेरून काही लोक घरातील सर्व महत्वाचे सामान घेऊन जातात, यासाठी कप्तान म्हणून माधवला जबाबदार ठरवले जाते. त्यानंतर सर्वजण कान पकडून बिग बॉसची माफी मागतात. (हेही वाचा: बिग बॉसच्या घरातून सुरेखा पुणेकर बाहेर, तर नेहावर सदस्यांचा रोष व्यक्त झाल्याने डोळ्यांत दिसले अश्रू)

त्यानंतर वीणा, शिव, अभिजित आणि वैशाली या शिक्षेबाबत जास्त सिरीयस नाहीत हे पाहून इतर सदस्य या चौघांवर भडकतात आणि मोठे भांडण सुरु होते. या भांडणात घरातील सर्व सदस्य सामील होऊन दोन्ही ग्रुपला तडे जात असल्याचे दिसू लागते. यावेळी हीना आणि शिव एकमेकांवर आरडा ओरडा करतात. रात्री रुपाली आणि नेहा याबाबत चर्चा करून वीणा कशी बदलली आहे, ती लहन मुलासारखे वागते याबद्दल गॉसिप करतात.

अखेर बिग बॉसकडून कप्तानपदासाठीच्या टास्कची घोषणा केली जाते. आता हे टास्क कोणते असतील हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.