
कालच्या भागात रुपालीला मात देऊन अभिजितने कप्तानपदासाठीचा टास्क जिंकला आहे. आजच्या भागाची सुरुवात किशोरी, वीणा आणि रुपाली यांच्या घनघनाती चर्चेने होते. आपला ग्रुप तुटत आहे हे लक्षात आल्यावर तिघीही चर्चा करून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतात. मात्र ही चर्चा भरकटली जाते व परत चर्चेचे रुपांतर एकमेकींची उणीदुणी काढण्यात होते. अखेर वीणा आणि रुपाली यांनी ग्रुप तोडला, त्या मला समजून घेत नाहीत असा आरोप किशोरी करतात. त्यांतर तिघीही वैयक्तिकरित्या हा खेळ खेळतील असे ठरते.
हा ग्रुप तुटत आहे हे पाहून बाकीचे आनंदी झालेले दिसत आहेत. किशोरी नेहाशी बोलत असताना अभिजित, शिव, वैशाली आणि वीणा या सर्व गोष्टीबाबत चेष्टा मस्करी करतात. त्यानंतर बिग बॉसकडून ‘हाफ तिकीट’ हा नॉमिनेशन टास्क दिला जातो. यामध्ये प्रत्येक सदस्याला आपल्याकडील हाफ तिकीट पूर्ण करायचे आहे. एकमेकांना कन्व्हिन्स करून समोरच्याकडील हाफ तिकीट मिळवून पूर्ण तिकीट बनवणे हा टास्क आहे. पहिल्यांदा वीणा आणि नेहा ही जोडी समोर येते. दोघीही या आठवड्यात आपल्याला पूर्ण तिकीट मिळणे का गरजेचे आहे हे पटवून देण्यासाठी आपापले मुद्दे मांडतात, मात्र दोघीही हार मानत नाहीत. अशाप्रकारे नेहा आणि वीणा दोघीही या आठवड्यासाठी नॉमिनेट होतात. (हेही वाचा: टास्क दरम्यान खालच्या पातळीला जाऊन सदस्यांनी केला एकमेकांचा अपमान)
त्यानंतर शिव आणि हीना यांची जोडी एकमेकांना समजवण्यासाठी समोर येते. इथे दोघांमध्ये खूप चर्चा होते, मात्र शिव बाजी मारतो. हीना आपले हाफ तिकीट शिवला देऊन त्याचे तिकीट पूर्ण करते. (अखेर हीनाचे एकतर्फी प्रेम शिववर असल्याचे सिद्ध होते. हीना फक्त प्रेमाखातर स्वतःचे तिकीट शिवला देते.)
त्यानंतर वैशाली आणि किशोरी एकमेकींना समजवायला सुरुवात करतात. इथे वैशाली किशोरीची कोणतीही गोष्ट ऐकायला तयार होत नाही. अखेर दोघीही एकमेकींना तिकीट देत नाहीत अशारितीने किशोरी आणि वैशाली या आठवड्यासाठी नॉमिनेट होतात. शेवटी रुपाली आणि माधव एकमेकांसमोर येतात. इथेही तेच घडते, दोघेही एकमेकांना तिकीट देत नाहीत. अशाप्रकारे या आठवड्यासाठी रुपाली, माधव, किशोरी, वीणा, नेहा, हीना, वैशाली हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत.