
छोट्या पडद्यावरील मनोरंजक तितकाच वादग्रस्त शो बिग बॉस (Bigg Boss) आता प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या 3 ऑक्टोबरला बिग बॉस 14 (Bigg Boss 14) सुरु होणार आहे. अशात या शो मध्ये यंदा कोण स्पर्धक भाग घेतील याविषयी चर्चा सुरु आहे. यामध्ये काही दिवसांपूर्वी टीव्हीवरील लोकप्रिय भूमिका ‘गोपी बहु’ साकारणारी अभिनेत्री जिया मानेकचे (Giaa Manek) नाव समोर आले होते. जिया यंदा बिग बॉसच्या घरामध्ये स्पर्धक म्हणून येणार होती. मात्र आता निर्मात्यांनी आपला विचार बदलला आहे व जियाला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. Spotboye ने याबाबत वृत्त दिले आहे.
जिया मानेक आणि मेकर्स यांच्यामध्ये शोबाबत चर्चा सुरु होती. सर्व गोष्टी ठरल्या होत्या व त्यानुसार जियाने आपली तयारी करायला सुरुवात केली होती. आपले कपडे, पीआर अशा गोष्टींचीही तयारी जिया करू लागली होती. मात्र आता तिचे नाव रद्द करण्यात आले आहे. यामागे जियाने मागितलेली ‘फी’ हे कारण असल्याचे सांगितले जात आहे. इतर रिपोर्ट्सचा आधार घेतला तर, जियाने ऐनवेळी निर्मात्यांकडे काही मागण्या केल्या होत्या, ज्या नामंजूर झाल्या व जिया आणि निर्मात्यांमधील डील फिसकटली. आता यंदाच्या सिझनमध्ये जिया मानेक बिग बॉसमध्ये येणार नाही. (हेही वाचा: सिद्धार्थ शुक्ला, गौहर खान, हिना खानसह प्रिंस नरूला ची सुद्धा होऊ शकते बिग बॉस च्या घरात रिएन्ट्री)
यानंतर आता जियाची जागा अभिनेत्री रुबीना दिलक (Rubina Dilaik) आणि अभिनव शुक्ला (Abhinav Shukla) घेत आहेत. मेकर्सना असा विश्वास आहे की या दोघांची केमिस्ट्री शोचा टीआरपी वाढवण्यास मदत करेल. रुबीना आणि अभिनव व्यतिरिक्त, एइजाझ खान, जसमीन भसीन, निशांतसिंग मलकानी, पवित्र पुनिया हे टीव्ही कलाकार बिग बॉसमध्ये दिसणार आहेत. तसेच सुरुवातीच्या काळात शोमध्ये थोडा मसाला भरण्यासाठी, तीन लोकप्रिय माजी स्पर्धकांना दोन आठवड्यांसाठी बिग बॉसच्या घरामध्ये पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये सिद्धार्थ शुक्ला, हिना खान आणि गौहर खान अशी नावे आहेत.